ठाणे शहरातून जलवाहतुकीचा नवा पर्याय उभा राहावा यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न सुरू केले असून, ठाण्याच्या खाडीमार्गे जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय वाहतूक महामार्ग आणि नौकानयनमंत्री नितीन गडकरी मध्यंतरी ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. तेथे त्यांनी महापालिकेच्या नियोजित प्रकल्पांना हिरवा कंदील दाखविण्याची तयारी दाखवली. त्यामुळे हुरूप आलेल्या महापालिकेने गडकरी यांच्या हाकेला ओ देण्याची तयारी चालवली असून ठाणे खाडी (बेडेकर महाविद्यालय) ते साकेत तसेच ठाणे ते घोडबंदर अशा मार्गावर जलवाहतुकीस परवानगी देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. हे प्रस्ताव तसे जुनेच असले तरी गडकरी यांच्या सकारात्मकतेमुळे त्याची नव्याने आखणी केली जात असून हे मार्ग मुंबई, नवी मुंबईला जोडता येतील का, याची चाचपणीही सुरू करण्यात आली आहे. महापालिकेचे शहर अभियंता के. डी. लाला यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई शहरातील दळणवळणात सुलभता आणण्यासाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी विमानतळाच्या धर्तीवर ‘वॉटरपोर्ट’ उभारण्यात येईल, असे सूतोवाच नितीन गडकरी यांनी ठाण्यात केले होते. यापूर्वीच महापालिकेने खाडी मार्गावर जलवाहतूक सुरू करण्यासंबंधी सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून ठाणे ते साकेत या खाडी मार्गावर जलवाहतुकीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा विचारही सुरू आहे. ठाणे खाडीला तिवरांच्या जंगलाचा विस्तीर्ण असा पट्टा लाभला आहे. त्यामुळे खाडीत कोणताही प्रकल्प सुरू करताना केंद्रीय पर्यावरण तसेच वाहतूक विभागाची स्वतंत्र परवानगी लागणार आहे. केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळाल्यावर या प्रकल्पांची प्रत्यक्ष आखणी करणे शक्य होणार आहे. गडकरी यांच्या आवाहनामुळे महापालिकेने या प्रकल्पांच्या सादरीकरणाची तयारी सुरू केली आहे.
प्रदूषणमुक्त प्रवास..
खाडीमध्ये समुद्राप्रमाणे लाट येत नाहीत. भरती आणि ओहोटीवर पाण्याची पातळी कमी-जास्त होत असते. त्यामुळे या प्रकल्पासाठी सुरुवातीलाच खाडीतील गाळ काढावा लागेल. त्यानंतर पुन्हा गाळ काढावा लागणार नाही. खाडीमध्ये हा जलवाहतुकीचा प्रकल्प यशस्वी होऊ शकतो, असा दावा महापालिकेचे नगर अभियंता के. डी. लाला यांनी केला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरांना जोडणाऱ्या खाडीमधून जलवाहतूक सुरू झाली तर या शहरांना जोडण्यासाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होईल. तसेच जलवाहतुकीचा प्रवास प्रदूषण मुक्त आणि स्वस्त असल्यामुळे नागरिकांसाठी फायदेशीर ठरू शकेल आणि शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मदत होऊ शकेल. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे खाडीच्या दोन्ही बाजूस सुशोभीकरण करण्यात येईल आणि त्यामुळे खाडीलगत वाढणाऱ्या बेकायदा बांधकामांना आळा बसेल, असे लाला यांनी स्पष्ट केले.