येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्यावतीने रविवारी दुसरी राष्ट्रीय आणि सातव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंग उपस्थित राहणार आहेत. खुल्या राष्ट्रीय गटासाठी ४२.१९५ किलोमीटर पुरूष पुर्ण मॅरेथॉन तर २१.०९७ किलोमीटर पुरुष अर्धमॅरेथॉन तसेच महिलांसाठी याच अंतराच्या अर्ध मॅरेथॉन गट राहणार आहे. ज्येष्ठांसाठी काही वेगळे गट राहणार आहेत. स्पर्धेत स्थानिक पातळीसह राज्य व देशभरातून जवळपास पाच हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.
या बाबतची माहिती बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांनी दिली. आरोग्याविषयी जागृती व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, भविष्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने मविप्र मॅरेथॉनची संकल्पना मांडण्यात आली आहे. १ जानेवारी १९९४ पासून संस्थांतर्गत पहिल्या मॅरेथॉनपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. स्पर्धेसाठी गतवर्षीचे विजेते नीलेश बोंडे, सूर्यकांत पेहेरे यांच्यासह सेनातील अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनी नोंदणी केली आहे. स्पर्धेस महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या कल्पना तेंडूलकर व अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने श्री. व्ही. बेंगले निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी आरएफआयडी या संगणकीय चीपचाही वापर केला जाईल. ही चीप केवळ पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन व महिलांच्या अर्ध मॅरेथॉनसाठी वापरली जाईल. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्पर्धेच्या सुमारास रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू मुलांची आणि मुलींची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. या शिवाय, त्या त्या ठिकाणी संबंधितांची भोजनाची व्यवस्था केली जाईल, असे पवार यांनी नमूद केले. स्पर्धा मार्गावर आठ रुग्णवाहिका आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात राहील. आवश्यक प्रथमोपचार आणि ४० खाटांचे रुग्णालयही सज्ज ठेवण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा साडे अकरा वाजता कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात नारंग यांच्या हस्ते होईल. स्पर्धेतील १ ते ११ क्रमाकांचे आणि मॅरेथॉन स्पर्धेतील १ ते ९ या क्रमांकाचे नैपुण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिके व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेला नाशिककरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. मविप्र शिक्षण संस्थेने संस्थेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांची माहिती पवार यांनी दिली. शालेय स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मोफत शिक्षण व त्यांच्या निवास, भोजनाची जबाबदारी संस्था स्वीकारणार आहे. तसेच खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी नेताजी सुभाष क्रीडा प्राधिकरण संस्थेची मदत घेण्यात येणार आहे.

१४ गट आणि सुमारे सात लाखाची पारितोषिके
दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेत १४ गट उतरविले जाणार असून स्पर्धेतील विजेत्यांना एकूण सहा लाख ८२ हजार ६०० रुपये इतक्या रकमेची रोख पारितोषिके दिली जाणार आहे. संस्थांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आठ गट तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सहा गट हे राज्यातील विविध जिल्ह्यातील व नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंसाठी राहणार आहेत. खुल्या राष्ट्रीय गटासाठी ४२.१९५ किलोमीटर पुरुष पूर्ण मॅरेथॉन. २१.०९७ किलोमीटर पुरुष अर्धमॅरेथॉन, महिलांसाठी २१.०९७ किलोमीटर पुरुष पूर्ण मॅरेथॉन. तसेच ४५ वर्षांवरील पुरुष गटासाठी १२ किलोमीटर राहणार असून ४० वर्षांपुढील महिला गटासाठी सहा किलोमीटरचे अंतर राहील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ६० वर्ष वयोगटावरील पुरुषांसाठी स्वतंत्र गट करण्यात आला असून त्याचे अंतर चार किलोमीटर आहे. अशा एकूण सहा गटात ही स्पर्धा होईल.

स्पर्धेचा मार्ग
संपूर्ण मॅरेथॉन स्पर्धा गंगापूर रोड या मार्गावर घेण्यात येणार असून स्पर्धेची सुरुवात मविप्र मॅरेथॉन चौक, कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहापासून गंगापूर रोडमार्गे जुना गंगापूर नाका, विद्या विकास चौक, आनंदवल्ली, सोमेश्वर, राधाकृष्ण बाग, हॉटेल गंमतजंमत, दुगाव फाटा, गिरणारे, धोंडेगाव व परत मविप्र मॅरेथॉन चौक व रावसाहेब थोरात सभागृह येथे पूर्ण होईल.