सर्वसाधारणपणे शास्त्रीय संगीतात २२ श्रुतीने गायले जाते. या २२ श्रुतींचे विभाजन करून गायन अतिशय अवघड असते. त्यात श्रुती व श्रुती अंतराची स्थाने वेगळी असतात. ही अवघड गायकी अवगत करणाऱ्यास ‘गंधर्व’ म्हटले जाते. येथील संस्कृती वैभव संस्थेतर्फे १६ व १७ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित गंधर्व महोत्सवात सर्व गंधर्वाच्या गायन शैलीची अनुभूती नाशिककरांना मिळणार आहे. सर्व गंधर्वाचा सर्वसमावेशक असा हा पहिलाच अनोखा प्रयोग ठरणार आहे. याच कार्यक्रमात संस्थेतर्फे ‘संस्कृती वैभव’ पुरस्काराने प्रसिध्द गायक आनंद भाटे उर्फ आनंद गंधर्व आणि नाशिकचे सुभाष दसककर यांना गौरविले जाणार आहे.

दोन दशकांपासून शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत संस्कृती वैभव संस्थेतर्फे दरवर्षी प्रतिष्ठित कलावंताचा जीवनपट तरुण पिढीसमोर उलगडून दाखविण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले जाते.
आतापर्यंत ग. दि. माडगुळकर, पु. ल. देशपांडे, विद्याधर गोखले, मंगेशकर, किशोरकुमार यांच्या नावाने झालेल्या महोत्सवास यंदा गंधर्व महोत्सवाची जोड मिळणार आहे.
‘मैत्रेय ग्रुप-संस्कृती वैभव गंधर्व महोत्सव’भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदन दीक्षित यांनी दिली. या उपक्रमास नाशिक महापालिकेचे सहकार्य लाभले आहे.
संगीत क्षेत्रातील मान्यवरांना संस्थेच्या वतीने संस्कृती वैभव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पुणे येथील प्रसिध्द गायक आनंद भाटे उर्फ आनंद गंधर्व तसेच नाशिक येथील उस्ताद परवेज यांचे शिष्य सुभाष दसककर यांची निवड करण्यात आली आहे. प्रसिध्द गायक सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवात सर्व गंधर्वावर परिसंवाद आणि त्यांची गायन शैली सादर करण्यात येईल.
पहिल्या दिवशी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर सर्व गंधर्वाविषयीची माहिती, चित्रफित आणि त्यांची गायनशैली सादर केली जाईल. महोत्सवानिमित्ताने विशेष स्मरणिकेचे प्रकाशन केले जाईल.
गायन कार्यक्रमात आनंद भाटे, पंडित सत्यशील देशपांडे, कौशल इनामदार, आदित्य ओक, चैतन्य कुंटे, राजीव परांजपे सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी संस्कृती वैभव पुरस्कार वितरण सोहळा होईल. पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या गायन व वादनाचा कार्यक्रमही होईल. ‘बालगंधर्व चित्रपट तयार करतानाचे अनुभव’ या विषयावरील परिसंवादात नितीन देसाई, रवी जाधव, अभिनेता सुबोध भावे, आनंद भाटे, आदित्य ओक, राजीव परांजपे, विभावरी देशपांडे सहभागी होतील.
या पाश्र्वभूमीवर, आठ फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय नाटय़ संगीत तसेच सुगम संगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संयोजकांनी सांगितले.
एसएमआरके महिला महाविद्यालयातील पाटणकर सभागृहात ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील अंतिम विजेत्यांना महोत्सवात गौरविले जाणार आहे. कार्यक्रम सर्व नाशिककरांसाठी खुला असून त्याच्या प्रवेशिका टीजेएसबी बँकेच्या शाखा व इतर ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे संयोजकांनी नमूद केले.