महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रवींद्रनाथ टागोर म्हणजे विचार, कर्तृत्व व भावनांचे प्रतीक होय, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त माध्यम परिवाराच्या वतीने आयोजित ‘गांधी, आंबेडकर, टागोर हे भारताचे सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ या विषयावर डॉ. जाधव यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. गोपाळराव पाटील होते. व्यासपीठावर आमदार अमित देशमुख, रामानुज रांदड, जयप्रकाश दगडे उपस्थित होते. आपल्या तासाभराच्या भाषणात डॉ. जाधव यांनी आंबेडकर, गांधी व टागोर या तिन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर तीव्र मतभेद झाले असले, तरी आपल्यापेक्षा देश महत्त्वाचा आहे ही एकवाक्यता त्यांच्यात होती. टागोर हे गांधीजींपेक्षा आठ वषार्ंनी मोठे होते, तर आंबेडकर २२ वर्षांनी लहान होते. या तिन्ही नेत्यांची संसदीय लोकशाहीवर प्रचंड निष्ठा होती. तिघेही धार्मिक वृत्तीचे होते. धर्म व नीतीवर त्यांनी भर दिला. आंबेडकर बुद्धिवादी होते, तर गांधीजी श्रद्धावान व नीतिमत्तेचा, समानतेचा आग्रह धरणारे होते. टागोर आध्यात्मिक परंपरा जोपासणारे होते.
गांधीजी व आंबेडकर या दोघांमध्ये आपणच दलितांचे एकमेव तारणहार, अशी भावना होती. गांधीजींच्या मनात दलितांविषयी अतीव सहानुभूती होती, तर आंबेडकरांजवळ जळजळीत अनुभूती होती. आंबेडकरांना सुराज्य, तर गांधीजींना स्वराज्य हवे होते. गांधीजींना महात्मा पदवी टागोरांनी दिली तर रवींद्रनाथांना गुरूवर्य ही उपाधी महात्मा गांधींनी दिली. रवींद्रनाथांच्या कविता, साहित्य आजच्या विद्रोही साहित्य प्रकारात मोडणाऱ्या आहेत. उपेक्षितांची त्यांना अतिशय कणव होती. छत्रपती शिवरायांबद्दल त्यांना अभिमान होता. बंगालीमध्ये शिवरायांवर त्यांनी प्रदीर्घ कविता केली. सन १९२१ मध्ये गांधीजींनी एक वर्षांत स्वराज्य मिळवण्याचा नारा दिला, तेव्हा रवींद्रनाथांनी गांधीजींवर तुमचे ध्येय चांगले असले तरी मार्ग चांगला नाही, अशी टीका केली होती. १९३४ मध्ये बिहारमध्ये भूकंप झाल्यानंतर गांधीजींनी अस्पृश्यतेमुळे देवांनी ही शिक्षा दिली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी अतिशय कडक शब्दांत गांधीजींची कानउघडणी केली होती. आपल्यासारख्या मोठय़ा नेत्याने अशास्त्रीय दृष्टिकोन पत्करावा याचे खेदपूर्ण आश्चर्य वाटले, या शब्दांत आपल्या भावनांना त्यांनी वाट मोकळी करून दिली होती.
प्रास्ताविक जयप्रकाश दगडे यांनी केले. अध्यक्षीय समारोप डॉ. गोपाळराव पाटील यांनी केला. सूत्रसंचालन सोमनाथ रोडे यांनी केले.

मला मांसाहाराची सवय!
राजस्थान विद्यालयाच्या खुल्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास प्रचंड गर्दी होती. विजेच्या प्रकाशामुळे व्यासपीठावर किडय़ांची इतकी गर्दी झाली की, डॉ. नरेंद्र जाधव हे बोलत असताना एक किडा त्यांच्या तोंडात गेला. या वेळी संयोजकांची धावपळ उडाली. काही वेळासाठी व्यासपीठावरील प्रकाशझोत बंद करण्यात आला. पण आपले भाषण सुरू ठेवत डॉ. जाधव म्हणाले, काही चिंता करू नका, मला मांसाहाराची सवय आहे. त्यांच्या या टिप्पणीला उपस्थितांनी दाद दिली.