दारू पिऊन वाहन चालवू नका, वाहतुकीचे नियम पाळा आणि रात्रीच्या पाटर्य़ा आटोपल्यानंतर घरी परतण्यासाठी स्वत:च्या वाहनाऐवजी टॅक्सीने प्रवास करा, असा सल्ला सिने अभिनेते व विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांनी रविवारी दिला. ठाणे वाहतूक पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ‘गांधीगिरी स्टाइल’ने गुलाबाचे फूल देऊन लिव्हर यांनी वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले.
रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने वाहतूक पोलीस विश्रांती बूथ आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासंबंधी माहिती देणाऱ्या २४ मोठय़ा फलकांचे अभिनेते जॉनी लिव्हर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ठाणे वाहतूक पोलिसांच्या कासारवडवली शाखेजवळील पटांगणात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गेली ४० वर्षे प्रवासादरम्यान अनेक अपघात पाहून खूप वेदना झाल्या. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी व्यवस्था समजून घेतली पाहीजे. पोलीस नवीन योजना आणतात, धोकादायक वळणावर फलक असतात. पण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केल्याने अपघात घडतात. जीवन महत्त्वाचे असून आपल्यावर जबाबदारी आहे. कुटुंब आपली वाट पाहत असते. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये, विनाहेल्मेट प्रवास करू नये, असे त्यांनी या वेळी सांगितले. रस्त्यावर वाहन चालविताना आपल्या हातात स्टेअरिंग अर्थात मशीन असते. त्यावर कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
दारू पिऊन वाहन चालविणे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवू नका, अशी विनंती त्यांनी या वेळी नागरिकांना केली. युवा पिढीने वेगाने तसेच विनाहेल्मेट वाहन चालविण्याच्या अतिउत्साहपणावर संयम ठेवला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच महिलांच्या सुरक्षेकरिता वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ आणि ‘सेफ जर्नी’ उपक्रमाचे या वेळी त्यांनी कौतुक केले.
रस्ते सुरक्षेसाठी निधी
मिळावा – शिंदे
एड्सपेक्षा रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, एड्स निर्मूलनासाठी सरकारमार्फत जितका निधी उपलब्ध होतो, तितका रस्ते सुरक्षेसाठी मिळत नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून जमा होणारा निधी रस्ते सुरक्षेसाठी खर्च झाला पाहिजे, असे मत व्यक्त करत त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात सांगितले. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.