गणेश जयंतीचा कार्यक्रम वाईत उत्साहात साजरा करण्यात आला. येथील महागणपती मंदिरात यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेशभक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती.
माघ शुद्ध चतुर्थी, विनायकी चतुर्थीला गणपतीचा वाढदिवस असतो. येथील शिवकालापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या धुंडी विनायक मंदिरात दुपारी बारा वाजून एक मिनिटाने गणेशजन्माचा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता.
महागणपती मंदिर, धुंडी विनायक मंदिर व कृष्णा पुलावरील शेंडे गणपती मंदिरात सकाळी सनई चौघडा वाजविण्यात येत होता. दिवसभर भजनकीर्तन व गणपती भक्तिगीतांचे कार्यक्रम सुरू होते. येथील महागणपती मंदिरातील दर्शनासाठी गणपती घाटावर गावोगावच्या गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. या मंदिरात आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भोर येथील गणेशभक्ताने सनई चौघडा वाजविणारे यंत्र देवस्थान ट्रस्टला भेट दिले. मंदिरावर विद्युतरोषणाई करण्यात आली होती. महाप्रसादाचे आयोजनही धुंडी विनायक मंदिरासह अनेक मंडळांनी आयोजित केले होते.