कल्याण डोंबिवली पालिकेतील लाचखोर साहाय्यक आयुक्त गणेश बोराडे याच्या मालमत्तेची कसून चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यातील पोरज व नायदेवी या दोन गावी बोराडे कुटुंबियांच्या नावाने २२ हेक्टर ८४ गुंठे जमीन असल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. या परिसरातील जमीन वडिलोपार्जित आहे की अलीकडच्या काळात बोराडेने खरेदी केली आहे याची प्राथमिक माहिती पोलीस घेत आहेत. खामगाव तालुक्यातील तहसीलदारांच्या २ मे २०१३ च्या महसुली दप्तरानुसार बोराडे याच्या पोरज, नायदेवी गावांतील शेत जमिनीची माहिती ‘लोकसत्ता’ला मिळाली आहे. या जमिनींचे गाव नमुने ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध आहेत. नायदेवी गावातील शेतीची नोंद दर्शविणारे गट क्रमांक १६३ व पोरज गावातील गट क्रमांक १४१ वर बोराडे यांच्या कुटुंबातील गणेश सारंगधर बोराडे, सुरेखा गणेश बोराडे(पत्नी), आकाश गणेश बोराडे(मुलगा), सागर गणेश बोराडे(मुलगा) यांच्या नावाने जमिनी आहेत. या जमिनींवर बोराडे यांचे नातेवाईक व इतर हक्कदारांची नावे आहेत. या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये काही ठिकाणी ‘गणेश सारंगधर’ या नावाने नोंदी आहेत. तर काही ठिकाणी ‘बोराडे’ व ‘बोराळे’ या नावाने गफलत करून जमिनीच्या नोंदी पूर्ण करण्यात आल्या आहेत. नायदेवी गावातील गट क्र. १६३ मध्ये ९७४ या फेरफारानुसार गणेश व आकाश बोराडेंच्या नावाने १६ तुकडय़ांमध्ये प्रत्येकी सव्वा एकर जमिनीच्या नोंदी आहेत. पोरज गावातील गट क्र. १४१ मध्ये ९७५ या फेरफारानुसार सुरेखा गणेश बोराडे, आकाश सारंगधर बोराडे, सागर बोराडे, गणेश बोराडे या नावाने सोळा
तुकडय़ांमध्ये चारही कुटुंबधारकांच्या नावावर अडीच हेक्टरहून अधिक जमिन कागदोपत्री दिसून येत आहे. अन्य नातेवाईकांच्या नावानेही या गटात जमिनी आहेत. ही जमीन शेकडो एकर असण्याची शक्यता चौकशी सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. बोराडेला अटक केल्यापासून प्राप्तिकर विभागाने आपल्या नजरा कल्याण डोंबिवली पालिकेकडे वळविल्या आहेत असे समजते.  

बोराडे निलंबित
लाचखोर गणेश बोराडे ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्याने पालिका प्रशासनाने सोमवारी त्याच्या निलंबनाचे आदेश काढले. हे आदेश प्रशासनाने काढू नयेत म्हणून काही ‘कॉइन बॉक्स’ म्हणून ओळखले जाणारे ‘दलाल’ पत्रकार प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते. पालिकेतील एक माजी उच्चपदस्थ अधिकारी बोराडेच्या अटकेने खूप अस्वस्थ झाला आहे. बाहेर राहून तो काही दलालांना हाताशी धरून बोराडेवर कमीतकमी कारवाई या दिशेने हालचाली व्हाव्यात असे प्रयत्न करीत असल्याचे समजते.
मोबाइल तपासणी
गणेश बोराडे याचे तीन वर्षांतील मोबाइलवरील संभाषण चौकशी पथकाने तपासले तर अनेक धक्कादायक माहिती बाहेर येणार आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील बोराडे याच्या मोबाइलच्या हालचाली, त्याचे संभाषण तपासले तर चौकशी पथकाला बोराडेची चौकशी करण्याचे काम आणखी हलके होणार असल्याचे सांगण्यात येते.