आवड असली की सवड मिळते असे म्हटले जाते. या उक्तीनुसार नाशिकच्या अभय रोजेकरने हाती असणारा वेळ आणि उपजत असलेल्या कौशल्याची सांगड घालत घरगुती गणेशोत्सवाचे रुप बदलले. कधी टाकून दिलेल्या ‘बार्बी’च्या बाहुल्या अन् डांगराच्या बिया तर कधी घरातील कापड यांचा आधार घेत नेत्रदीपक चलचित्र म्हणजे फिरता देखावा तयार करायचा ही त्याची खासियत. या वर्षी स्त्री भ्रृण हत्येचा विषय हाताळून गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्याचा जागर सुरू आहे. विशेष म्हणजे, त्याची कला स्थानिक सीमा ओलांडून साता समुद्रापार पोहचली आहे. अनेक परदेशी पर्यटकांनी कधी प्रत्यक्ष तर कधी इ मेलच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधला आहे.
पंचवटी परिसरातील सरदार चौकात राहणारा अभय रोजेकर याला बालपणापासून ‘गणपतीचे’ असे खास आकर्षण. त्यामुळे  आपले पदवी शिक्षण पूर्ण होताच फिरत्या देखाव्यातील काही तांत्रिक गोष्टी त्याने समजून घेतल्या. आपली दैनंदिन कामे करताना उरलेला वेळ आणि हाती असलेले कौशल्य याची सांगड घालत पाच वर्षांपासून त्याने घरगुती गणेशोत्सवाला वेगळा आयाम दिला आहे. पर्यावरण संवर्धनासोबत ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेवर भर देत अभयने प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. दसऱ्याचे सोने वाटून झाले की, त्याच्या कामाला सुरूवात होते. गणेशोत्सवानंतर वर्षांतील दहा महिने तो या कामात स्वत:ला गुंतवून घेतो. पाच वर्षांपूर्वी गांधीजीचा ‘खेडय़ाकडे चला’ हा संदेश देणारा ग्रामीण संस्कृतीवर आधारीत देखावा त्याने तयार केला होता. त्यानंतर ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’च्या धर्तीवर सुंदर बगीचा, त्यातील स्वच्छता, बगीच्यात आवश्यक असणाऱ्या गोष्टी याकडे लक्ष वेधले. गाडीच्या खराब झालेल्या टायरपासून अभयने तिसऱ्या वर्षी शेष नाग तयार केला.
यंदा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या स्त्री भ्रृण हत्या विषयावर चलचित्र देखावा तयार केला आहे. गर्भातील अशक्त बालिकेची डॉक्टर हत्या करत असल्याचे दर्शवत त्याबद्दल त्यांना तीन वर्षांचा कारावासासह ५० हजार रुपयांचा दंड होवू शकतो याची माहिती देण्यात आली आहे. स्त्रीभ्रुण हत्या करू नये असे आवाहन करणारे फलकही त्याने लावले आहेत. दुसरीकडे मुलगी जन्माला आली, तिचे योग्य संगोपन झाले तर ती यशस्वी होऊ शकते हे दाखविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यशस्वी महिलांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्याच्या देखाव्यांना अनेक गणेशोत्सव मित्र मंडळ आणि विविध स्पर्धामध्ये पारितोषिके मिळाली आहेत.
वारली चित्रकला कला शैली त्याने आत्मसात केली.घरातील काही सजावट वारली चित्रांच्या धर्तीवर आहे. सजावट आणि ही चित्रे पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक त्याच्या घरी येतात. काहींनी यासाठी इंटरनेटचा आधार घेतला तर काहींनी थेट त्याच्या घरी भेट दिली आहे. भारतीय कला, संस्कृतीची माहिती इतरांना व्हावी, यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे अभय सांगतो.