News Flash

श्रीमंत मोरया श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या आरत्या

अथर्वशीर्ष आणि गणेश संकीर्तन याचं निर्दोष आणि संथेनुसार केलेलं पठण यात ऐकण्यास मिळतं. केवळ गणेशोत्सवातच

| September 15, 2013 01:01 am

अथर्वशीर्ष आणि गणेश संकीर्तन याचं निर्दोष आणि संथेनुसार केलेलं पठण यात ऐकण्यास मिळतं. केवळ गणेशोत्सवातच नाही तर कधीही हे ऐकल्यास मन टवटवीत होईल, यात शंका नाही. नेहमी कानावर पडणाऱ्या आरत्यांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या म्हणजे दगडूशेठ गणपतीचे गोडवे गाणाऱ्या आरत्यांचा यात समावेश आहे. या ट्रस्टच्या मंडळानेच या आरत्या व अथर्वशीर्ष म्हटलं आहे. लालबागच्या राजाकडे सेलिब्रिटी मंडळींचे पाय वळले आणि दगडूशेठ गणपतीचे बहुचर्चित्व कमी झालं, हे यानिमित्ताने आठवलं. भक्तही आपल्या देवाच्या बाबतीत डावं-उजवं करतात, हे आश्चर्यकारकच.
श्री गणनायका
श्रेयस अंगणे आणि प्रीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेल्या या अल्बममध्ये सुरेश वाडकर, शंकर महादेवन, बेला शेंडे आदी गायकांचा समावेश आहे. सुरेश वाडकर यांनी गायलेलं ‘गणनायका’ हे संथ लयीतील व खालच्या स्वरातील गाणं चांगलं जमून आलं आहे. हेच गाणं बेला शेंडेच्या आवाजातही ध्वनिमुद्रित करण्यात आलं आहे. ही दोन्ही एकल गाणी म्हणजे या अल्बमचे प्रमुख वैशिष्टय़ ठरावं. जावेद अलीने गायलेलं ‘मोरया है’ हे दणकेबाज गाणं उत्सवाची वातावरणनिर्मिती करतं, तर ‘श्री गणेश मोरया’ (गायक- कृष्णा बेउरा), ‘डोंगरीचा राजा’ (गायक- सुहास सावंत) ही गाणी त्यात भर घालतात.  शंकर महादेवन आणि कृष्णा बेउराने गायलेल्या ‘मेरा मौला मोरया’ या गाण्यावर चढविण्यात आलेला कव्वालीचा साज अनाकलनीय आहे. याचे शब्दही खटकणारे आहेत. ओढूनताणून सर्वधर्मसमभावाचं दर्शन घडविण्याचा हा प्रयत्न केविलवाणा ठरला आहे.  अल्बमच्या अखेरीस अभिनेता सचिन खेडेकरच्या आवाजात एक वेगळा विचार मांडणारी कविता ऐकण्यास मिळते.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची जशी दीर्घ परंपरा आहे, त्याचप्रमाणे गणेशगीतांनाही मोठा इतिहास आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली श्रीगणेशाची आरती आजही घराघरांत म्हटली जाते. गेल्या काही दशकांत तर गणेशगीतांमध्ये सातत्याने भर पडत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर ‘टाइम्स म्युझिक’ने ‘श्रीमंत मोरया, श्रीगणनायका आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या आरत्या’ असे तीन नवे अल्बम गणेशभक्तांपुढे सादर केले आहेत.
आनंद कुऱ्हेकर यांनी संगीतबद्ध केलेला ‘श्रीमंत मोरया’ हा अल्बम ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे’ यांनी प्रस्तुत केला आहे. या अल्बमची सुरुवात ‘गणेश सुप्रभातम’ या श्लोकाने होते. विजया एल. शंकर आणि महाथी विजयप्रकाश यांच्या निखळ स्वरांमुळे पवित्र वातावरणाची सहजनिर्मिती होते. ही उत्तम रचना प्रा. स्वानंद पुंड यांची आहे. सध्याची आघाडीची गायिका बेला शेंडे हिने गायलेल्या ‘भावभक्तीचा गुलाल उधळून तोरण लावा दारी’ हे गाणं ठेका धरायला लावतं तर हरहुन्नरी सोनू निगमने ‘श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय’ हे गाणं ठसक्यात गायलं आहे. (गीत-वैभव जोशी) या गाण्यात पारंपरिक ढोल-ताशाचा चांगला वापर केला आहे. शंकर महादेवनने गायलेलं ‘कृपा असू दे आम्हावरी’ हे गाणंही उल्लेखनीय आहे.
या अल्बमचे वैशिष्टय़ म्हणजे अनुराधा पौडवाल यांनी गायलेली दगडूशेठ गणपतीची आरती. याशिवाय शंकर महादेवन आणि पं. संजीव अभ्यंकर यांच्यासह ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरतीही त्यांनी गायली आहे. कमालीचा गोड आवाज असणाऱ्या या गायिकेचा स्वर आजही तितकाच ताकदीचा आहे. दगडूशेठच्या महाआरतीमध्ये पं. संजीव अभ्यंकर यांचा कसलेला आवाज ऐकण्यास मिळतो. ब्रह्मवृंदाच्या खणखणीत स्वरातील अथर्वशीर्षांचाही यात समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:01 am

Web Title: ganesh festival songs dagdusheth ganpati songs
Next Stories
1 ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सव
2 पश्चिम विदर्भातील दीड लाख शेतकऱ्यांची वीज कापली
3 बाप्पावरच श्रद्धा
Just Now!
X