महागाईच्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना ‘श्री’ उत्सवावरही महागाईचे सावट आहे. गणेशमूर्तीच्या किमतीत यंदा तब्बल ४० ते ४५ टक्के दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले.
सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. धान्य, भाजीपाला, पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, सर्वसामान्यांच्या खिशाला त्यामुळे कात्री लागत आहे. नांदेडातही श्री उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. जिल्हाभरात सुमारे दोन ते अडीच हजार सार्वजनिक मंडळांकडून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा या उत्सवावर महागाईचे सावट आहे.
जिल्ह्यात गणेशमूर्ती तयार करणारे ४५ ते ५० कारखाने आहेत. शिवाय रायगड, पेणसह अनेक भागांतून मूर्ती मागवल्या जातात. नांदेडात तयार होणाऱ्या गणेशमूर्तीना आंध्र प्रदेशातल्या बोधन, आदिलाबाद, निजामाबाद, म्हैसा, डिचपल्ली, हैदराबादमध्ये चांगली मागणी आहे. नांदेडात तयार होणाऱ्या मूर्तीपकी ६० टक्के मूर्ती आंध्र प्रदेशात विक्री केल्या जातात. यंदा मूर्तीच्या किमतीत मोठी वाढ झाली. मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे दर वाढले आहेत. दुसरीकडे कुशल कारागिरांची वानवा आहे. मूर्ती तयार करण्यास कुशल कामगार मिळत नसल्याने एरवी दीडशे ते दोनशे रुपयांत उपलब्ध होणाऱ्या कामगारांना आता साडेतीनशे ते चारशे रुपये दाम मोजावे लागत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. रंगांच्या किमतीही लक्षणीय वाढल्या आहेत. इंधनाचे दरही वाढतच आहेत. एकूणच ४० ते ४५ टक्के दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदाही वेगवेगळय़ा मूर्ती नांदेडात दाखल झाल्या आहेत. लालबाग, टिटवाळा, दगडूशेट यासह यंदा नवीन काही मूर्ती यात आहेत. मूर्तीच्या किमतीत वाढ झाली, तसेच सजावटीचे साहित्यही महागले. गणेशोत्सव ९ सप्टेंबरला सुरू होणार आहे. आतापासूनच बाजारपेठा फुलल्या असल्या, तरी महिनाअखेरीमुळे गर्दी नाही. सप्टेंबर सुरू होताच खऱ्या अर्थाने बाजारात उठाव दिसू लागेल, असा व्यापाऱ्यांना विश्वास आहे.