मराठवाडय़ात सर्वत्र गणरायाला मोठय़ा उत्साहात निरोप देण्यात आला. औरंगाबादजवळील नाथनगर वडखा येथे विसर्जनास गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी प्रकार वगळता सर्वत्र गणेशविसर्जन शांततेत पार पडले.
ढोलताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास मानाच्या संस्थान गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. गणेश महासंघाचे अध्यक्ष बापू घडामोडे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, महापौर कला ओझा आदींची उपस्थिती होती. नारेगावपासून जवळ असणाऱ्या नाथनगर वडखा येथील तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करावयास गेलेल्या अक्षय पुरुषोत्तम कुलकर्णी व अनिल पिराजी गायके यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या दोन तरुणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले.
दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी झांज, ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने गणेशमूर्तीचे विसर्जन केले. जायकवाडी जलाशयात गोदावरीच्या ऊध्र्व धरणातून पाणी सोडल्याशिवाय मूर्तीचे विसर्जन न करण्याची भूमिका महासंघाने घेतली होती. मात्र, आठ दिवसांत पाणी सोडले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने आंदोलन मागे घेतल्याचे विसर्जन मिरवणुकीच्या वेळी सांगण्यात आले. विसर्जन मार्गावर विविध राजकीय पक्षांनी व्यासपीठ उभे करून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी बहुतांश नेत्यांनी हजेरी लावली. मिरवणुकीच्या निमित्ताने शहरात कडक पोलीस बंदोबस्त होता.
१४ मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल
विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या १४ गणेश मंडळांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहने बाजूला घेण्याच्या वारंवार सूचना देऊनही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार पोलीस हवालदार ए. एस. भंडारी यांनी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
बीडमध्ये मुलाचा मृत्यू
गणेशविसर्जनास तलावावर गेलेल्या शहराच्या स्वराज्यनगर भागातील हृषीकेश शिवाजी मोरे (वय १३) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. स्वराज्यनगर भागातील गणेशभक्त घोडका राजुरीवरील तलावावर गेले होते. या वेळी हृषीकेश मोरे याचा बुडून मृत्यू झाला. यापूर्वी पाटोदा तालुक्यातील घुमरेवस्तीवरील दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान, गणेशविसर्जन मिरवणूक सर्वत्र शांततेत पार पडली. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. विसर्जनाच्या दिवशीही सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी सर्वत्रच चांगला पाउस झाला. पावसातच गणेशभक्तांनी ढोलताशांच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी हाक देत गणरायाला निरोप दिला.
गुलाल, डॉल्बीविना लातुरात गणेशविसर्जन
गुलालाची उधळण व डॉल्बीविना लातूरकरांनी गणरायाला भक्तिभावाने निरोप देत राज्यातील गणेश मंडळांसमोर वेगळा आदर्श ठेवला.
सुमारे १२ तास येथील श्रींची विसर्जन मिरवणूक चालली. दुपारी २ वाजता मिरवणुकीस प्रारंभ होऊन मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास सर्व सार्वजनिक मंडळांचे गणेशविसर्जन पार पडले. गणेशचतुर्थीपूर्वीच पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, अतिरिक्त अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, शहर उपअधीक्षक तिरुपती काकडे यांनी सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प समोर ठेवला होता. त्यानुसार डॉल्बीविना सार्वजनिक मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना झाली. विसर्जन मिरवणुकीतही पोलिसांनी मंडळांना विश्वासात घेऊन आखणी केली. शहरात ५ ठिकाणी विसर्जनाची तयारी केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झाला. पोलिसांच्या दिमतीला सुमारे २०० स्त्री-पुरुष पोलीस दक्ष नागरिक मंचाचे सदस्य म्हणून सहभागी झाले होते. शहरातील पाचही भागांत पार पडलेल्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी गुलालाऐवजी फुलांची उधळण केली. डॉल्बी नसल्यामुळे हलगी व बँडचे भाव मात्र वधारले होते.
भारत रत्नदीप आझाद मंडळाच्या आजोबा गणपतीला परंपरेने मिरवणुकीत मानाचे स्थान होते. मुख्य मिरवणुकीत ४०पकी २० मंडळांनी देखावे सादर केले. यातील एका देखाव्यातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्त्रीभ्रूणहत्या, भ्रष्टाचार, मतदानातील उदासीनता, रुपयाची घसरण या विषयांवरही देखावे सादर करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांची तुलना करणारे फलकही लक्ष वेधून घेत होते. श्रीिहद मंडळाने यंदाही आपले वेगळेपण दाखवून देताना ४० तरुणांनी देशभक्तिपर पंजाबी गीत सादर केले. स्वामी विवेकानंद १५०व्या जयंतीनिमित्तचा देखावाही मंडळाने सादर केला. सराफ सुवर्णकार मंडळातर्फे प्लॅस्टिकचे दुष्परिणाम यावर देखावा सादर करण्यात आला. ज्ञानदीप, बाप्पा, महालक्ष्मी या मंडळांचे देखावेही आकर्षक होते. मुख्य आकर्षण असणाऱ्या अमर मंडळाच्या देखाव्याने टाळय़ा मिळवल्या. कचऱ्यामुळे त्रस्त नागरिकांनी मागच्या वेळी लोकसभेत कोल्हापूरचा पलवान पाठवला. आता लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या लातूरकरालाच लोकसभेत पाठवू, असा मजकूर असणारा फलकही लक्ष वेधून घेत होता.
औसा रस्त्यावरील लातूरचा राजा, लातूरचा महाराजा, जनकल्याण निवासी विद्यालय, केशवराज शैक्षणिक संकुल, सदानंद विद्यालय यांनीही मिरवणुकीत लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत यंदाही महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महापालिका, स्वयंसेवी संस्थांच्या वतीने प्लॅस्टिकमुक्त लातूर अभियान राबवण्यात आले. त्यास लातूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
नांदेडला उत्साहात निरोप
गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करीत नांदेडकरांनी गणरायाला उत्साहात निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत शांततेत गणेशमूर्तीचे विसर्जन पार पडले.
शहरातील निम्मेअधिक गणपती गोदावरी नदीत, तर उर्वरित आसना नदीत विसर्जति करण्यात आले. ढोलताशांवर ठेका धरत निघालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. सर्वच सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणात तरुण सहभागी झाले होते. श्रीनगर, भाग्यनगर, आनंदनगर, शिवाजीनगर, वजिराबाद, जुना मोंढा आदी भागातील सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांसमोर मोठय़ा प्रमाणात तरुण बेधुंद नाचताना दिसून आले. शहरात चोख बंदोबस्त होता.