गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तयारीला सुरुवात होत असताना गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता महापालिकेने कंबर कसली असून महापौर सुधाकर सोनवणे यांनी पालिका आधिकाऱ्यांची सोमवारी बठक घेतली. मागील वर्षीच्या गणेशोत्सवात जाणवलेल्या अडचणी व या वर्षी त्या दृष्टीने करावयाची महत्त्वपूर्ण कार्यवाही यावर सविस्तर चर्चा केली.उच्च न्यायलाच्या निर्देशानुसार गणेशोत्सव मंडळांनी प्रथम पोलीस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असून त्यांनतर विभाग कार्यालयामार्फत संबधित मंडळांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यांनतर लवकरात लवकर परवानगीपत्र देण्यात यावीत असे निर्देश महापौरांनी दिले. विर्सजन तलावांची स्वच्छता, तेथील निर्माल्य कलशांची व्यवस्था व साफसफाई, साठलेल्या निर्माल्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट, विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करणे, विसर्जन स्थळांवर पुरेशी विद्युत व्यवस्था तसेच विद्युत जनरेटर व्यवस्था, मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक तराफे, फोर्कलिफ्ट व्यवस्था आदी विविध महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.