News Flash

गणेशोत्सव मंडळे मालामाल..महापालिका कंगाल

गणेशोत्सवात लाखो रुपयांच्या जाहिराती घेत महत्त्वाच्या चौकांमध्ये प्रवेश फलकांची आरास मांडणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील मोठय़ा गणेशोत्सव मंडळांनी यंदाही महापालिकेचा महसूल बुडविल्याची माहिती पुढे येत आहे.

| September 4, 2014 06:52 am

गणेशोत्सवात लाखो रुपयांच्या जाहिराती घेत महत्त्वाच्या चौकांमध्ये प्रवेश फलकांची आरास मांडणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील मोठय़ा गणेशोत्सव मंडळांनी यंदाही महापालिकेचा महसूल बुडविल्याची माहिती पुढे येत आहे. शहरातील राजकीय नेते, व्यापारी, बडे उद्योजक, विकासक अशांची जाहिरात करणारे फलक कल्याण डोंबिवली परिसरात जागोजागी लागले आहेत. महत्त्वाच्या मार्गावर उत्सव साजरा करणारे मंडळे या माध्यमातून लाखो रुपयांचा जाहिरात निधी गोळा करतात. मात्र, अशी जाहिरातबाजी करताना स्थानिक महापालिकेस भरावा लागणारा निधी चुकविण्याचे प्रकार घडू लागल्याने ‘मंडळे मालामाल महापालिका मात्र कंगाल’, असे चित्र या भागात दिसत आहे.

विशेष म्हणजे, मोठय़ा प्रमाणावर जाहिरात निधी बुडत असतानाही महापालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ३०२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांकडून उत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी २५ हजारांपासून काही लाखांच्या घरात देणग्या वसूल केल्या जातात. तब्बल दहा दिवस शहराच्या प्रमुख चौकांमध्ये जाहिराती झळकत असल्याने बडे बिल्डर तसेच उद्योजक मंडळांना ठरावीक निधी देऊन फलक उभारून घेतात. जाहिरातींचे हे फलक उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खणले जातात. हे खड्डे खणताना महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. पैसे दानशुरांचे, रस्ते पालिकेचे आणि पैसे मात्र मंडळाच्या तिजोरीत असा प्रकार या भागात सुरू आहे. या सगळ्या व्यवहारात गणेशोत्सव काळात लाखाच्या उलाढाली होऊनही महापालिकेला जाहिरात करापोटी एक छदामही मिळत नसल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

डोंबिवलीत गेल्या वर्षी भरवस्तीत असलेला बिअरबार हटवण्यासाठी मनसे, भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार प्रयत्न केले. त्या बारवरील फलक काही काळ बाजूला काढून टाकण्यात आला. आता त्याच बारची जाहिरात करणाऱ्या मोठय़ा कमानी डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावरील फडके रस्त्यावर नागरिकांचे स्वागत करीत आहे. गणपतीचा नियमित उत्सव करणाऱ्या एका गणेश मंडळाने या बारचे असे जाहीर कौतुक केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवार तसेच राजकारणातील अयाराम गयारामांच्या जाहिराती सार्वजनिक गणपती मंडळाच्या प्रवेशद्वारावर, मखराच्या बाहेरील बाजूकडील पडद्यांवर लावण्यात आल्या आहेत. या राजकीय मंडळींनी मंडळांना सुमारे २५ हजारांपासून ते लाखभराच्या देणग्या दिल्याचे बोलले जाते. आचारसंहिता लागण्यापूर्वी केलेल्या खर्चात अडचण नको आणि दणकून प्रचार करण्याची संधी म्हणून या इच्छुकांनी हात सैल सोडला आहे. भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी एक लाख आरतीची पुढील पाच वर्ष टिकतील अशी पुस्तके घराघरांत पोहचवली असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते. यासंबंधी महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रकाश ढोले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप व इतर परवानगी देण्याचे काम प्रभाग क्षेत्र अधिकारी करतात, असे सांगितले. या मंडळांकडून रस्त्यांवर, चौकात ज्या जाहिराती, कमानी लावण्यात येतात त्यावरील कर वसुली करण्याचे काम महापालिकेने नेमलेल्या विजय अ‍ॅडव्हर्टायझिंग या एजन्सीचे आहे. ही एजन्सी या जाहिरात फलकांच्या माध्यमातून जमा झालेला कर पालिकेच्या तिजोरीत जमा करते, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘विजय जाहिरात एजन्सी’चे विजय इंगळे यांनी सांगितले, डोंबिवलीत महापालिकेची परवानगी न घेता हे जाहिरात फलक गणपती मंडळांनी लावले आहेत. अशा प्रकारे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची खंत इंगळे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 6:52 am

Web Title: ganesh utsav mandal get more rich
टॅग : Revenue
Next Stories
1 भपकेबाज सजावटीचा निधी माळीणच्या उभारणीसाठी
2 अंबरनाथमध्येही विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना पसंती
3 लोकलचा मार्ग तोच, खोळंबाही रोजचाच, कारण मात्र वेगळे..
Just Now!
X