‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत उद्या, शुक्रवारी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी शहरातील बाजारपेठ आणि चितारओळ गर्दीने फुलली आहे. दुपारच्यावेळी पावसाने हजेरी लावल्याने मूर्तीकार आणि सार्वजानिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.
गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी विदर्भात सुरू असून विविध भागात मूर्तीची विक्री करणारे शेकडो स्टॉल लागले आहेत. विविध सार्वजानिक मंडळात मंडप आणि सजावट केली जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. चितारओळीसह शहरातील विविध भागात गणपतीच्या मूर्तींची विक्री होत असताना सकाळी काही वेळ पाऊस आला. दुपारी चांगले उन्ह तापल्याने मूर्तीकार आणि नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, दुपारनंतर पुन्हा शहर आणि जिल्ह्य़ातील काही भागात पाऊस झाल्याने सार्वजानिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांंची धावपळ झाली.
पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी सर्व बाजारपेठा आज गर्दीने फुलल्या होत्या. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवडय़ाचे पान, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना आज चांगली मागणी होती. प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही खरेदी सुरू झाली असून प्रसाद साहित्याचीही मोठी उलाढाल बाजारात सुरू आहे. गणरायांच्या आगमनाची लगबग आज घरोघरी सुरू होती. उद्या सकाळी गणपतीची प्रतिष्ठापना असल्यामुळे सकाळपासूनच घरोघरी प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेशमूर्ती चितारओळीतून मूर्ती वाजत गाजत नेल्या जात होत्या. नागपूर बाहेरील अनेक सार्वजानिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकत्यार्ंनी चितारओळीत गणपतीची मूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती. बाहेरगावचे गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर सकाळपासून चारचाकी गाडय़ांची जणू रांग लागली होती.
संती गणेशोत्सव मंडळासह शहरातील विविध भागातील गणपती मूर्ती ढोल ताशांच्या निनादात दुपारी चितार ओळीतून नेण्यात आली. चितारओळीत सकाळच्या वेळी झालेली गर्दी बघता चितारओळकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद न केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. चितारओळीत मिळेल त्या जागेवर विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे गणपतीच्या मोठय़ा मूर्ती चितारओळीतून बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शहरात नंदनवन, लालगंज, जागनाथ बुधवारी, जुनी शुक्रवारी, महाल, प्रतापनगर, गोकुळपेठ भागात गणपतीचे स्टॉल लावण्यात आले आहे. चिटणीस पार्कमध्ये मूर्तीकार संघटनेचे स्टॉल लावण्यात आले असून त्या ठिकाणी केवळ मातीच्या मूर्तीची विक्री केली जात आहे. एकीकडे गणपतीच्या मूर्ती महागल्या असताना ५ ते १० रुपयाला मिळणारे गणपतीचे वाहन असलेल्या मूषकांची विक्री २० ते २५ रुपयाला केली जात होती.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेची वेळ
श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहा वाजेपासून दुपारी १.३० ही सर्वोत्तम वेळ असल्याचे विद्या राजंदेकर यांनी सांगितले. गणेशपूजनाचे हे व्रत भाद्रपद चतुर्थीला करायचे असते. त्यामुळे सूर्योदयापासून मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करता येईल. दुपारी दीड वाजतापूर्वी माध्यान्ह आरती व नैवेद्य दाखवणे अपेक्षित असल्याने त्यापूर्वी प्रतिष्ठापनेचा विधि पूर्ण होणे आवश्यक आहे. ही वेळ साधण्यासाठी सकाळी सहा ते दुपारी १.३० वाजेपर्यंत प्रतिष्ठापना करावी व नंतर माध्यान्ह आरती करून प्रसाद घ्यावा. दीड दिवसाचा गणपती ज्यांच्याकडे असतो त्यांनी ॠषीपंचमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी विसर्जन करावे, गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशाचे पार्थिव पूजन कुळाचाराप्रमाणे करावे,   देवाघराजवळ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी म्हणजे देवाच्या पूजेनंतर लगेच गणेश मूर्तीची पूजा करता येते. देवघराजवळील वातावरण शुद्ध व पवित्र असावे, असेही त्यांनी सांगितले.