इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी भरलेला सोनी कंपनीचा ट्रक बंदुकीचा धाक दाखवून लूटणाऱ्या टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ६७ लाख ५६ हजार ६८४ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. नवनाथ म्हसे (३४), रोहिदास होले (३४), सचिन गाढवे (२७) आणि सोमनाथ हांडे (२७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी पुण्यातली खेड तालुक्यातील राजगुरूनगर जवळच्या होलेवाडीचे राहणारे आहेत.  
नवी मुंबईतील सोनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतून २२ मे रोजी रात्री १० वाजता एससीडी, मोबाइल फोन, होम थिअटर, हॅन्डीकॅम्प, रेकॉर्डिग मिडीया, मोबाइल अ‍ॅक्सेसरीज, प्ले स्टेशन अशा एकूण सुमारे ९७ लाख ९ हजार २७१ रुपयांचा माल भरून एक ट्रक मुंबई आग्रा रोडने नागपूरच्या दिशेने निघाला होता. मुंबई साकीनाका परिसरात राहणारा राजकुमार प्रसाद हा ट्रकचालक ट्रक घेऊन शहापूर गावच्या हद्दीतील चेरीपोली घाटातून जात असताना एक स्वीफ्ट कार या ट्रकसमोर आडवी आली. त्यातून बाहेर आलेल्या चार व्यक्तींनी चालक राजकुमार यास खाली खेचून त्याला स्विफ्ट कारमधून नाशिककडे घेऊन निघाले. त्यापैकी एकाने आडवलेला ट्रक ताब्यात घेऊन सिन्नर एमआयडीसीमध्ये नेला. तेथे सर्व माल उतरून घेण्यात आला व हा ट्रक नाशिक रोडवर सोडून देण्यात आला. माल लुटल्यानंतर वाहकाला याच रस्त्यात सोडून दरोडेखोर फरार झाले. तपास सुरू केल्यानंतर काही वेळातच चोरीस गेलेला ट्रक नाशिकरोडवर सापडला. मात्र त्यातील बहुतेक माल लुटण्यात आला होता.  महाराष्ट्रातील खबऱ्यांकडून पोलिसांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असता या आरोपाशी संबंधित आरोपी पुण्यातील राजगुरूनगरचे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा माल विकण्यापूर्वीच चारही आरोपींना अटक केली.
चोरीसाठी मामाची स्विफ्ट..
नवनाथ म्हसे हा या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी असून रोहिदास हा त्याचा मित्र तर अन्य दोघे त्यांचे चालक आहेत. गुन्ह्य़ासाठी त्यांनी आदल्या दिवशी सोनी कंपनीच्या मालाने भरलेल्या ट्रकची टेहळणी करून ठेवली होती. नवनाथ याने आपल्या मामाची स्विफ्ट कार मुंबईला जायचे आहे असे सांगून घेतली होती. माल लुटल्यानंतर तो रोहिदास याच्या घराजवळ लपवून ठेवण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या सर्वाना अटक करून हा गुन्हा उघड केला.