आराम बसवर दरोडा टाकून चौदा लाख रुपयाची पंचवीस किलो चांदीची लूट करणा-या  रेठरे बुद्रक येथील टोळीला सातारा शहर पोलिसांनी पकडले. बहुतांश माल हस्तगत केला.
कोल्हापूर येथील श्रीनाथ कुरीअर आंगडीया सर्व्हिसचा कर्मचारी चांदीचा माल घेऊन मुंबईकडे जात होता. यामध्ये लक्ष्मी मूर्ती,  गणपतीच्या मूर्ती, पंजण व इतर पूजा साहित्य होते. कुडाळ-पुणे एसटी बसमधून जात असताना साता-याजवळ आल्यानंतर बबलूसिंग या कर्मचा-याला आपली पिशवी कापल्याचे लक्षात आल्याने मागे बसलेल्या प्रवाशास ही माहिती सांगितली, तेव्हा तो प्रवासी काहीतरी लपवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यत बस एसटी स्टॅंडवर पोहोचली. गाडीतून उतरणा-या त्या प्रवाशाला बबलूसिंगने पकडून ठेवल्याने त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.  तोपयर्ंत  गाडी एसटी स्टँडवर उभी राहिली. झटापटीत बाकीचे चोरटे पसार झाले. बबलूसिंग चोर चोर म्हणून जोरजोरात ओरडत असल्याने त्या ठिकाणी पोलीस जमा झाले. त्यांनी वरिष्ठांना कळविले.  पोलिसांनी ताबडतोबीने प्रयत्न केल्याने सर्व चोरटयांना महामार्ग परिसरात पकडले. या चोरटयांचे दोन सहकारी कोल्हापूरपासून मोटारसायकल वरुन आराम गाडय़ांचा पाठलाग करत होते  त्यांनाही मोटारसायकलसह पोलीसांनी ताब्यात घेतले. याकामी पोलीस उपाधीक्षक उल्हास देशमुख, पोलीस निरीक्षक रविंद्र पिसाळ, उपनिरीक्षक आर. आर. कसबेकर, सहायक फौजदार भीमराव पवार आदींनी कष्ट घेतले.