बिल्डरच्या तरुण मुलीला ब्लेडने वार करून जखमी केल्यानंतर बुरखा घातलेल्या तीन लुटारूंनी घरातील दागिने लंपास केल्याची घटना नंदनवन येथील कामगारनगरात मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
कामगारनगरात प्रकाश तिजारे राहतात. ते बिल्डर आहेत. सोमवारी रात्री ते पत्नीसह एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी सदरमध्ये गेले होते. घरी त्यांची मुलगी रविना (१९) ही होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास पाणी प्यायला ती गच्चीवरून किचनरुममध्ये आली. पाणी पिऊन निघण्याच्या तयारीत असतानाच तीन लुटारू अचानक घरात शिरले. त्यांनी तोंडावर स्कार्फ बांधले होते. रविनाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी गप्प राहण्यास सांगितले. तिने दाद न दिल्याने लुटारूंनी तिच्या हातापायावर ब्लेडने चिरे मारले. त्यानंतर तिचे हातपाय आणि तोंड बांधून तिला हॉलमध्ये ठेवले. या दरम्यान घरातील रोख आणि दागिण्यांबाबत दोन लुटारू रविनाला सारखी विचारणा करत होते. तर एक जण घरातील सामान पाहत होता. यानंतर एकाच्या हाती ४० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी सापडली. यानंतर ते निघून गेले.
लुटारू पळून गेल्यानंतर रविनाने स्वतची सुटका करून घेतली व आई-वडिलांना दूरध्वनीवरून माहिती दिली. माहिती मिळताच आई-वडील घरी आले. याचवेळी नंदनवन पोलीसही घटनास्थळी आले, रविनाने दिलेल्या माहितीनुसार लुटारूंचा शोध घेण्यात आला. मात्र, काहीही हाती सापडले नाही. जखमी रविनाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा तिजारे यांच्या घराच्या बाजूला एक कार्यक्रम सुरू होता. असे असताना कुणालाच लुटारू येताना किंवा पळताना दिसले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.