15 October 2019

News Flash

चालकाचा खून करून कापसाचा ट्रक लांबवला

बीड जिल्ह्यातून गुजरातला कापूस घेऊन जाणारी मालमोटार अज्ञात आठ जणांनी रस्त्यात अडवून चालकाचा धारदार शस्त्राने खून केला. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीररीत्या जखमी झाला

| February 27, 2014 03:00 am

बीड जिल्ह्यातून गुजरातला कापूस घेऊन जाणारी मालमोटार अज्ञात आठ जणांनी रस्त्यात अडवून चालकाचा धारदार शस्त्राने खून केला. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून, मृत व जखमीला रस्त्यात फेकून या चोरटय़ांनी साडेबारा टन कापसासह मालमोटार व ३६ हजारांची रोकड असा १५ लाखांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नगर-शिर्डी राज्यमार्गावरच हा थरार सुरू होता.
नारायण शंकर ढवळे (वय ४०) असे मृताचे माव असून धोंडिराम दादाराव जगदाळे (वय ३५, दोघेही राहणार डहाळेवाडी, ता. पाटोदा, जिल्हा बीड) हा गंभीररीत्या जखमी आहे. हे दोघे भागीदारीत कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. पाटोदा येथून कापूस घेऊन ते नगरमार्गे गुजरातकडे जात असताना मालमोटार अडवून हा प्रकार करण्यात आला. नगरच्या पुढे चोरटय़ांपैकी तिघांनी मालमोटारीचा ताबा घेऊन त्यातील ढवळे व जगदाळे या दोघांवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला.
नगर तालुक्यातील देहेरे टोलनाका गेल्यानंतर ही घटना घडली. तिघे केबिनमध्ये शिरल्यानंतर अन्य साथीदार या मालमोटारीच्या मागेच होते. ढवळे व जगदाळे यांची तोंडे बांधण्यात आली होती. जखमी अवस्थेतच त्यांना मागच्या जीपमध्ये टाकण्यात आले. दरम्यान ढवळे हा मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यासह जखमी जगदाळेला संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर शिवारात रस्त्याच्या कडेला फेकून देऊन कापसाच्या मालमोटारीसह हे चोरटे पळून गेले. जखमी धोंडिराम जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आठ चोरटय़ांविरुद्ध खून व रस्तालुटीचा गुन्हा दाखल केला आहे.

First Published on February 27, 2014 3:00 am

Web Title: gang loots cotton truck kills driver