News Flash

वाहनचोरांची टोळी जेरबंद

नाशिक शहरासह ग्रामीण भागात वाहनचोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू असताना आणि हे चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याची ओरड होत असताना ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना

| April 10, 2015 12:08 pm

नाशिक शहरासह ग्रामीण भागात वाहनचोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू असताना आणि हे चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याची ओरड होत असताना ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना जेरबंद केले आहे. या टोळीकडून आठ दुचाकी आणि पाच सायकल जप्त करण्यात आल्या. न्यायालयाने संशयितांना शुक्रवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही टोळी जेरबंद झाल्यामुळे वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्य़ांचा उलगडा होऊ शकणार आहे.
मागील काही महिन्यांपासून वाहनचोरीच्या प्रकारांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा प्रामुख्याने समावेश आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी चोरटय़ांना जेरबंद करण्यासाठी उघडलेल्या खास मोहिमेत ही टोळी पकडण्यात यश मिळाले. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन केले जात आहे. त्या अंतर्गत सापडलेल्या आक्षेपार्ह वाहनाच्या तपासात हरसूल परिसरात मोटारसायकल चोरणारी टोळी कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेने या माहितीच्या आधारे सोमवारी संशयितांना ताब्यात घेतले. प्रारंभी त्यांनी बनावट नावे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकींमध्ये निफाड, नाशिक शहरातील पंचवटी, म्हसरूळ व इतर भागांतील ८ मोटार सायकल आणि ५ सायकल्सचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी पेठ तालुक्यातील हातलोंढी येथील पिंपळवटी परिसरातून पुंडलिक रामू भंडागे (२५), मोहन गोविंद खेत्रे (१९) आणि सुरेश देवाजी भांगरे (२५) यांना अटक केली. संबंधितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, या तपासात चोरटय़ांची कार्यपद्धती स्पष्ट झाली. गावातून एका दुचाकीवर तिघे वाहन चोरण्यासाठी जायचे. एखादे वाहन बंगल्याबाहेर किंवा इमारतीच्या वाहनतळात दिसले की, कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने त्यास बनावट चावी वापरायची. ती गाडी सुरू झाल्यावर तिघांपैकी एक जण गाडी पुढे घेऊन जाई आणि मग दोघे थोडा वेळाने पसार होत. गावात आल्यावर खेत्रे यांच्या घराच्या मागील बाजूला पडवीत चोरलेले वाहन लपवून ठेवले जाई. असा त्यांचा नित्यक्रम सुरू राहिला. पोलिसांनी खेत्रे यांच्या घरातून चोरलेल्या मोटारसायकल्स व सायकल ताब्यात घेतल्या आहेत. या बाबतची माहिती निफाड पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 12:08 pm

Web Title: gang of car robbers arrested
Next Stories
1 ..तर उसाला हमी भाव देणे शक्य
2 मद्यपींना दूर ठेवून जयंतीचे पावित्र्य जपा
3 लाचखोर पोलीस नाईकाला अटक
Just Now!
X