निश्चित जागा उपलब्ध करण्याची युवक काँग्रेसची मागणी
गोदाघाट आणि रामकुंडाचे धार्मिक महत्त्व ओळखून दर्शनासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात. बहुतेक भाविकांकडून अन्नदान केले जाते. अन्नदानासाठी गंगाघाटावर निश्चित अशी जागा नसल्याने भाविक कुठेही अन्नदान करतात. त्यामुळे उघडय़ावर खाद्यपदार्थ विक्रेते तसेच भिकाऱ्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून परिसरास बकाल स्वरूप प्राप्त होत असल्याची तक्रार युवक काँग्रेसच्या वतीने महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्याकडे करण्यात आली आहे. हा प्रकार टाळण्यासाठी अन्नदानाकरिता गंगाघाटावर निश्चित स्थळ उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार जगताप यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
नाशिक हे धार्मिक स्थळ असून पंचवटीत देवदर्शनासाठी आल्यानंतर भाविक मोठय़ा संख्येने अन्नदान करतात. त्यामुळे रामकुंड, गोदाघाटावर उघडय़ावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. परराज्यातून आलेल्या भाविकांना अन्नदान करण्यासंदर्भात विशेष माहिती नसल्याने त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. अन्नदानासाठी निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाची विक्री करण्यात येत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
महापालिकेने गंगाघाट परिसरात अन्नदान करणे तसेच खाद्यपदार्थाची उघडय़ावर विक्री करण्यास मनाई केली असून त्याबाबत फलकदेखील लावलेले आहेत. मनपाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून बिनधास्तपणे सर्रास खाद्यपदार्थाची उघडय़ावर विक्री
होत आहे.
भिकाऱ्यांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत असून खाद्यपदार्थ विक्रेते आणि तरुण भिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारांमुळे धार्मिक क्षेत्र असलेल्या पंचवटी परिसरास बकाल स्वरूप प्राप्त होत असून नाशिकची प्रतिमा मलिन होत आहे. परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक व साधुसंत कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर अन्नदानाच्या कार्यक्रमांना आवर घालण्याची तसेच अन्नदानासाठी ठरावीक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी सुरेश मारू, तुषार जगताप, वीरेंद्र भुसारे, गणेश राजपूत, संतोष पवार, सागर निकम आदींनी केली आहे.