अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याच्या कामांची सुरुवात करण्यासाठी गुरुवारी ‘गंगा-गोदा पूजन’ सोहळा विविध आखाडय़ांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पार पडला. बहुतेक सिंहस्थ कामांना आधीच सुरुवात झाली असताना साधु-महंतांच्या आग्रहास्तव प्रशासनाने ‘वरातीमागून घोडे’ दामटण्याचा हा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
जिल्हा प्रशासन आणि साधु-महंत यांच्यात आदल्या दिवशी सिंहस्थ नियोजनाबद्दल बैठक झाली होती. त्या वेळी साधु-महंतांनी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढत हे काम संथपणे सुरू असल्याचे टीकास्त्र सोडले होते. या वेळी प्रशासनाने कोणकोणती कामे सुरू झाली याची यादी सादर केली. या कामांची पाहणी पावसाने उघडीप घेतल्यानंतर केली जाईल, त्यानंतर प्रशासनाशी पुन्हा चर्चा करण्याचे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी म्हटले होते. याशिवाय, प्रशासनाने कुंभशी संबंधित कामांची सुरुवात केली असेल अथवा काही कामे बाकी असतील तरी इतर शुभ कार्याप्रमाणे गणेशपूजनाप्रमाणे गंगा-गोदापूजनाचा कार्यक्रम करण्याची सूचना दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्याबरोबर त्याची कामे सुरळीतपणे व्हावीत, यासाठी असे पूजन आवश्यक असल्याचे ग्यानदास महाराज यांनी सांगितले. महंतांच्या सुचनेनुसार गुरुवारी सकाळी रामकुंडावर महंत ग्यानदास महाराज, दिगंबर आखाडय़ाचे शास्त्रीजी यांच्यासह विविध आखाडय़ाचे पदाधिकारी, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महापौर अॅड. यतीन वाघ, आ. नितीन भोसले, मेळा अधिकारी महेश पाटील, उपमहापौर सतीश कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत विधिवत गंगापूजनाचा सोहळा पार पडला. या वेळी माजी महापौर दशरथ पाटील यांच्या मागील कुंभमेळ्याची माहिती देणाऱ्या ‘विकास गंगा’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी सिंहस्थातील कामांचे नियोजन करून बरीचशी कामे सुरू केली आहेत. ही कामे प्रगतिपथावर असताना त्यांची सुरुवात करण्यासाठी झालेल्या पूजनाने नागरिक व भाविकही बुचकळ्यात पडले आहेत. सिंहस्थ निर्विघ्नपणे पार पडावा, अशी सर्वाची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रशासन, महापालिका, साधु-महंत, पोलीस यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करणे महत्त्वाचे आहे. बैठकीत परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायच्या आणि विघ्न टाळण्यासाठी पुन्हा असे कार्यक्रमांचे आयोजन करायचे यातील संबंध मात्र अनेकांना उलगडला नाही. प्रशासनाने साधु-महंतांच्या कलाने चालण्याचे निश्चित केले असल्याने सिंहस्थातील प्रसिद्धीचा एक सोहळा थाटात पार पडला.