भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा नदीची निर्मळता आणि स्वच्छतेसाठी शासन कटीबद्ध असून त्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी देशभरातून जनसमर्थन मिळत असल्यामुळे पाच वर्षांत गंगानदी स्वच्छ आणि निर्मळ होईल, असा विश्वास केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केला. उमा भारती यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी, संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. गो. वैद्य यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.
त्या शनिवारी नागपुरात आल्या असता प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. नर्मदा नदीवर बनविण्यात येणाऱ्या बांधामुळे गंगा नदीवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही. बांधाची उंची वाढल्याने त्याचा परिणाम गंगानदीवर होईल, हे वृत्त निराधार आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात पाच वर्षांत गंगा शुद्धीकरणाचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सरकार त्यासाठी कटीबद्ध आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या अपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येत्या पाच वर्षांत पूर्ण करेल, असा विश्वास आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच विकास कामावर जास्तीत जास्त जोर देणार आहे. गंगेचे शुद्धीकरण करण्यात आले तर वीज आणि सिंचनासाठी भरपूर पाणी मिळेल. गंगेमध्ये थुंकण्यावर दंडात्मक कारवाईवर अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही. तेही वृत्त निराधार आहे. गंगा मोहिमेसाठी नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि श्रीपाद नाईक या पक्षाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांचे समर्थन असल्यामुळे सर्वांच्या सहकाऱ्यांमुळे गंगा नदी स्वच्छतेचा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करू, असा त्यांनी व्यक्त केला.  गंगा बचाव अभियानाला आंदोलनाचे स्वरूप दिले जात आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात या अभियानास प्रारंभ करण्यात येईल. काँग्रेसने या अभियानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गंगा नदीची अवस्था फारच खराब झाली आहे. नर्मदा नदीवर होणाऱ्या बांधाच्या उंची संदर्भात जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. योग्य पावले उचलली असती तर मध्यप्रदेशचे वीजसंकट कधीचेच दूर झाले असते.  उत्तरांखड परिस्थितीसाठी राज्य शासन जबाबदार असल्याचे सांगून उमा भारती म्हणाल्या, शासनाने तेव्हा वेळीच कारवाई केली असती तर लाखो लोकांचे जीव वाचले असते. राज्यातील अनेक भागात पाण्याचा स्तर वाढला असता. शासनाने कोणत्याही क्षेत्राला खाली केले नाही. तत्कालिन मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी सर्व शव काढण्यात आल्याचा दावा केला. मात्र, नुकत्याच मिळालेल्या मृतदेहांमुळे बहुगुणा यांचा दावा पोकळ ठरला असल्याचा आरोप उमा भारती यांनी केला.