गंगापूर धरण परिसरात साकारल्या जाणाऱ्या पर्यटन केंद्र आणि बोट क्लबच्या योजनेवरून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. धरण परिसरात पक्क्या स्वरुपाच्या बांधकामास बंदी असताना ही कामे कशी सुरू आहेत, असा प्रश्न मनसेचे आ. नितीन भोसले यांनी केला होता. त्याचे उत्तर देताना जलसंपदामंत्र्यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याची तक्रार आ. भोसले यांनी विधानसभा सभापतींकडे केली आहे. याच मुद्यावरून विशेषाधिकाराचा भंग झाल्याची तक्रार करत त्यांनी दोषी मंत्री आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी केली.
नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी गंगापूर धरण परिसरात पर्यटन केंद्र आणि बोट क्लबची संकल्पना मांडली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडलेल्या या संकल्पेनुसार उपरोक्त प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असले तरी त्यास पर्यावरणप्रेमींनी आधीच विरोध दर्शविला आहे. धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने हा प्रकल्प चिंताजनक असल्याची तक्रार केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर, गंगापूर धरणाची सुरक्षितता आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने शासनाने काय निर्णय घेतला याबाबत आ. भोसले यांनी विचारणा केली होती. त्यावर जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी पर्यटनस्थळ विकास निधीच्या माध्यमातून हे काम केले जात असल्याचे नमूद केले. पर्यावरण विभागाचे मार्गदर्शन घेण्याचे काम सुरू असून त्या नियमांचे उल्लंघन न करता ही योजना राबविली जाणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले होते. तसेच धरण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करुनच ही योजना राबविली जाणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले. मंत्र्यांनी दिलेल्या याच उत्तरावर आ. भोसले यांनी आक्षेप नोंदविला आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने आधीच या स्वरुपाची परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाटबंधारे विभागाची त्याकरिता परवानगी घेतलेली नाही. पर्यावरणीय दाखला प्राप्त केल्याशिवाय व इतर शासकीय विभागांची परवानगी मिळविल्याशिवाय टप्पा दोनचे काम सुरू केले जाऊ नये असे प्रस्तावित केले आहे. या सर्वाचा अभ्यास केल्यावर तटकरे यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याचे दिसून येत आहे, असे आ. भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर, विशेषाधिकाराचा भंग झाल्याची सूचना मांडावी यासाठी आ. भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे.