शहरातील अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयांमध्ये गुंड कर्मचारी ठेवल्याची माहिती शहरातील दंतरोग तज्ज्ञ डॉ. मुकेश चांडक यांचा मुलगा युग (८) याच्या निर्घृण हत्येनंतर पुढे आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांवर दडपण ठेवण्यासाठी आणि बिले वसूल करण्यासाठी रुग्णालयांचे संचालक या गुंडांचा वापर करून घेत असल्याचेही अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये चढय़ा दराने बिले काढली जात असल्याचा नेहमीच आरोप केला जातो. यात तथ्य असल्याचेही अनेक घटनांवरून दिसून येते. परंतु यावेळी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आम्हीच कसे बरोबर आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करतात. चढय़ा दराने बिले काढल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा तेथील डॉक्टरांशी संघर्ष निर्माण होतो. यावेळी रुग्णालयाचे कर्मचारीच पुढे येऊन ‘ओरडण्याचे’ परिणाम काय होतील, याची जाणीव करून देतात. रुग्णाला फार मोठा गंभीर आजार आहे. डॉक्टरांनी कमीत कमी रकमेत शस्त्रक्रिया करून दिली, असे सांगण्यास कर्मचारी विसरत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा संबंधित डॉक्टरांवर फार मोठा विश्वास निर्माण होतो. यानंतरही रक्कम न मिळाल्यास हे गुंड कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांना धमकावून वसुली करतात, प्रसंगी मारहाणही करतात.  
रुग्णांचे नातेवाईक अमूक शस्त्रक्रियेसाठी किती खर्च येतो, याची विचारणा करतात. त्यानंतर तेवढय़ा रकमेची ते जुळवणूक करतात. परंतु बिल मात्र तीन ते साडे तीन लाख रुपये काढले जाते. यानंतरही जेव्हा रुग्णाचा मृत्यू होतो, तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांची काय मानसिक स्थिती झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. अशाही स्थितीत जोपर्यंत बिलाची रक्कम दिली जात नाही तोपर्यंत मृतदेह दिला जाणार नाही, अशी भूमिका डॉक्टर्स घेतात. अशा घटना शहरातील काही रुग्णालयांमध्ये घडलेल्या आहेत.
पश्चिम नागपुरातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तेव्हा याच रुग्णालयातील गुंड कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे, काही रुग्णालये मुद्दामहूनच असे गुंड कर्मचारी कामावर ठेवतात, नव्हे पोसतात. या कर्मचाऱ्यांना कोणते प्रशिक्षणही नसते. हे कर्मचारी रुग्णालयात अटेंडन्स पदावर व अन्य किरकोळ कामे करीत असतात. हे गुंड कर्मचारी अन्य कर्मचाऱ्यांवरही दहशत निर्माण करतात. दहशतीमुळे व डॉक्टरांच्या जवळकीमुळे अन्य कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवाक्षरही काढत नाहीत. एकीकडे उत्कृष्ट सेवेचा ढोल वाजवायचा आणि दुसऱ्या बाजूने रुग्णाचे हात खाली करावयाचे, असा दुर्दैवी प्रकार सध्या खासगी रुग्णालयात सुरू आहे.
काही रुग्णालये अपवाद
शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये गुंड वृत्तीचे कर्मचारी आहेत म्हणून सर्वच खासगी रुग्णालयांकडे बोट दाखवणे चुकीचे असल्याचे मत शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या संचालकांनी व्यक्त केले. योग्य सेवा आणि त्याचे योग्य बिल काढले तर संघर्ष निर्माण होण्याचा प्रसंगच उद्भवत नाही. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सुसंवाद असेल तर शंका घेण्याला वावच राहात नाही. परंतु काही रुग्णालयांमध्ये या गोष्टींची कमतरता असेल, त्याच्या भीतीपोटी गुंड कर्मचारी ठेवले जात असावेत, असेही या संचालकांनी सांगितले.