News Flash

ठाण्यात गुंडांच्या टोळ्या पुन्हा रस्त्यावर

ठाणे शहरात एकेकाळी आपला दबदबा आणि दहशत निर्माण करणाऱ्या गण्या सावंत, चंद्या बाटलीवाला, किरण कोळी आदी टोळ्या नामशेष झाल्या असल्या, तरी शहरातील वेगवेगळ्या भागात

| July 26, 2014 02:14 am

ठाणे शहरात एकेकाळी आपला दबदबा आणि दहशत निर्माण करणाऱ्या गण्या सावंत, चंद्या बाटलीवाला, किरण कोळी आदी टोळ्या नामशेष झाल्या असल्या, तरी शहरातील वेगवेगळ्या भागात आजही स्थानिक टोळ्या कार्यरत असल्याचे चित्र मंगळवारी सायंकाळी घडलेल्या घटनेमुळे पुढे येऊ लागले आहे. तीन पेट्रोल पंपसारख्या नेहमीच गजबजलेल्या परिसरात यापैकी एका टोळीचा भाग असलेल्या संजय रोकडे या गुंडास दुसऱ्या टोळीतील काही तरुणांनी यमसदनी धाडले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या टेकडी बंगला परिसरातील दोन टोळ्यांमधील संघर्षांतून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वसामान्य ठाणेकरही हादरले आहेत. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये काही राजकीय नेत्यांकडून होत असलेला गुंडापुंडांचा वापर ठाणेकरांना नवा नसला, तरी टोळ्यांमधील शत्रुत्व पुन्हा एकदा रस्त्यावर येऊन पोहचल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
ठाणे महापालिकेच्या कोपरी प्रभागातील पोटनिवडणुकीत अन्नू आंग्रे आणि सिद्धार्थ या स्थानिक टोळ्यांतील संघर्ष ठाणेकरांना पाहावयास मिळाला होता. ठाणे शहरातील टेंभीनाका येथील तेली गल्ली परिसरात राहणाऱ्या संजय रोकडे याची हत्या मंगळवारी सायंकाळी दोघांनी केली. याप्रकरणी मनीष आणि मंगेश जाधव या दोघा भावांसह त्यांच्या साथीदारांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे आरोपी फरारी असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या हत्येमागे टोळीयुद्धातील बदल्याची पाश्र्वभूमीवर असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. टेकडी बंगला परिसरात अफजल नामक भाई आणि किशोर गांगुर्डे यांच्यात वाद होते. यातूनच दहा वर्षांपूर्वी किशोरच्या टोळीने अफजलची हत्या केली. या हत्येचा बदला घेण्यासाठी अफलजच्या टोळीने किशोरची चार वर्षांपूर्वी हत्या केली. त्या हत्येनंतर या दोन्ही टोळ्यांमधील वाद आणखीणच वाढले होते. संजय रोकडे हा अफझलचा मित्र होता, तर मनीष हा किशोरचा नातेवाईक. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून मनीष आणि संजय यांच्यात वाद सुरू होते. २००८ पासून या दोघांनी एकमेकांवर तलवार, रॉड अशा शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून, त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील धुमसणाऱ्या वादातून अखेर संजयची हत्या झाली, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. कोपरी पोटनिवडणुकीतही अन्नू आंग्रे आणि सिद्धार्थ या दोघांच्या टोळीत हाणामारी झाल्याचे ठाणेकरांना पाहावयास मिळाले होते. या टोळ्यांचे काही हस्तक आता नगरसेवकही बनले असून, बडय़ा नेत्यांचे समर्थक म्हणून मोठय़ा ऐटीत फिरताना दिसत आहेत. काल-परवापर्यंत निवडणुकीदरम्यान गुंडांचा वावर वाढल्याचे चित्र असताना आता ठाण्यातील टोळीयुद्ध थेट रस्त्यांवर येऊ पोहचले आहे. या घटनांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात आजही स्थानिक टोळ्या कार्यरत असल्याचे दिसून येते. ठाणे पोलिसांनी अन्नू आंग्रे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असली, तरी शहरातील अन्य स्थानिक टोळ्या आजही मोकाटपणे कार्यरत असल्याचे दिसून येते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 2:14 am

Web Title: gangsters of thane on the road again
Next Stories
1 केबल संपल्याने डोंबिवलीत नवीन दूरध्वनी जोडण्या रखडल्या
2 कोंडीमुक्त घोडबंदर अद्याप दूरच
3 ठाण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टुरिस्ट डेपोचा प्रस्ताव
Just Now!
X