04 March 2021

News Flash

गप्पी मासे असलेल्या गटारात डासांची उत्पत्ती

कळंबोली येथील सेक्टर ५ मधील श्री अष्टविनायक सोसायटीलगतच्या सांडपाण्याच्या गटारामध्ये लाखो गप्पी मासे सोडूनही हिवताप (मलेरिया)

| March 17, 2015 06:35 am

कळंबोली येथील सेक्टर ५ मधील श्री अष्टविनायक सोसायटीलगतच्या सांडपाण्याच्या गटारामध्ये लाखो गप्पी मासे सोडूनही हिवताप (मलेरिया) डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. हा सर्व प्रकार शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा कक्षाचे माजी प्रमुख आत्माराम कदम यांनी उघडकीस आणला. सिडकोने उघडी असलेली गटारे स्वच्छ न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे हिवताप निर्मूलन विभागाने कारण देताना स्पष्ट केले आहे.
वर्षांतून एकदाच म्हणजे पावसाळा जवळ आला की सिडको वसाहतींमधील नालेसफाई करण्यात घेत असते. या चुकीच्या धोरणामुळे कळंबोलीमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी तक्रार येथील रहिवाशांकडून करण्यात येते. सेक्टर ५ येथील गटारांवर झाकण नसल्याने गटारात टायर व प्लॅस्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. त्यामुळे डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती झाली आहे. या गटारालगतच्या रस्त्यावर साफसफाई होते, परंतु या गटारांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या दरुगधीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.   हिवताप निर्मूलन विभागाचे कर्मचारी डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून गटारांमध्ये गप्पी मासे सोडण्याचे काम करतात, परंतु या गटारांच्या स्वच्छतेबाबत मात्र दुर्लक्ष होत आहे. श्री अष्टविनायक सोसायटीशेजारील गटारात लाखो गप्पी मासे फिरताना दिसतात, परंतु तेथेच डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. गप्पी मासे सोडूनही मलेरियाचे डास जन्माला येत असतील, तर सरकारच्या ‘गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा’ या ब्रीदवाक्याचा उद्देश फोल ठरत आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत या विभागाचे आरोग्यसेवक एस. एस. खारवाल यांना विचारले असता, आम्ही दर शनिवारी या गटारामध्ये लाखो गप्पी मासे सोडतो. परंतु गटारातील तुंबलेल्या सांडपाण्यामुळे डासांची पैदास होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कळंबोलीमधील अनेक गटारांवर झाकणे टाकण्यात आली आहेत, परंतु पावसाळ्यापूर्वी  या गटारांची स्वच्छता केली जाते. अष्टविनायक सोसायटीला लागून असलेल्या नवचैतन्य सोसायटीसह वसाहतीमधील गटारांशेजारील असणाऱ्या गृहनिर्माण सोसायटय़ांमध्येही ही परिस्थिती उद्भवली आहे.
सिडकोकडून वसाहतींमध्ये पावसाळ्यापूर्वी गटारे स्वच्छ करण्याचे काम केले जाते. श्री अष्टविनायक सोसायटीच्या गटारामध्ये तुंबलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा उपद्रव रोखण्यासाठी आपण कार्यकारी अभियंत्यांना तेथे पाहणी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच हे गटार स्वच्छ केले जाईल.
    -किरण फणसे, अधीक्षक अभियंता, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 6:35 am

Web Title: gappi fish panvel news
टॅग : Panvel
Next Stories
1 आकुर्लीतील वसतिगृहाच्या सुविधांकडे दुर्लक्ष
2 अचानक बोध झाला नि..२० वर्षांची सामान्यांची वाट रोखली
3 माथाडी कामगारांचा १६ मार्चला राज्यव्यापी बंद
Just Now!
X