निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद साळवे यांनी बुधवारी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी निषेधाच्या घोषणा देत कचरा फेक आंदोलन केले. स्थायी समिती व विषय समित्यांच्या निवडीच्या बैठकीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बहिष्कार घातल्याचे माजी नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी सांगितले.
प्रमोद साळवे यांनी प्रभाग क्र. २मधील तसेच बस स्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्यादरम्यान साठलेला कचरा साफ करण्यासाठी लेखी निवेदन दिले होते. साफसफाई न झाल्यास कचरा फेको आंदोलनाचा इशाराही दिला होता. नगरपालिकेने याकडे  दुर्लक्ष केल्याने आज कचरा फेको आंदोलन केले. या वेळी मुख्याधिकारी व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. प्रमोद साळवे म्हणाले, की यापुढे साफसफाईकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्यास येत्या आठवडय़ात मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनप्रसंगी दिलीप सारडा, बालाजी शेटे, गोविंद अय्या, फेरोज पटेल, सुनील चौधरी, स्वप्नील मुंढे, अजीज गुत्तेदार, अॅड. आनंद सूर्यवंशी आदींसह नागरिकही उपस्थित होते.
विषय समिती व स्थायी समिती निवडीसंदर्भात झालेल्या गंगाखेड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. मागच्या एक वर्षांत विषय समिती व स्थायी समितीची एकही बैठक झाली नाही, अशा समिती निवडीतून सत्ताधाऱ्यांना काहीही साध्य करायचे नाही. समितीच्या माध्यमातून विकासाचे नियोजन होत नसल्याने आम्ही बहिष्कार टाकला, असे डॉ. केंद्रे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेले कचरा फेको आंदोलन म्हणजे पंचनामा सभा फसल्यानंतर केलेली व्यर्थ धडपड आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा अलका चौधरी यांनी दिली.