झोपडपट्टय़ांमधून रेल्वे मार्गात मोठय़ा प्रमाणावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे मुसळधार पावसात पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण होत असून, त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे प्रसंग घडतात. याची पालिका आयुक्त अजय मेहता यांनी गंभीर दखल घेतली असून या कचऱ्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पालिका आणि रेल्वे प्रशासनाची पुढील आठवडय़ात संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
पावसाळ्यात रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी अजय मेहता यांनी गुरुवारी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेच्या टॉवर व्ॉगनमधून प्रवास करीत मध्य रेल्वेवरील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. पालिका आयुक्तांनी मस्जिद बंदर येथील वालपखाडी नाला, सँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यानचे नाले, तसेच शीव स्थानकाजवळील मुख्याध्यापक नाला, कुर्ला स्थानकाजवळील कारशेड नाला, कांजूरमार्ग येथील कर्वेनगर नाला, मुलुंडचा नाणेपाडी नाला यांची पाहणी केली.
अनेक ठिकाणी रेल्वे मार्गाला खेटून झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. या झोपडपट्टय़ांमधील नागरिक रेल्वे मार्गात कचरा भिरकावीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून पाहणी दौऱ्यात अजय मेहता यांनी या कचऱ्याची गंभीर दखल घेतली. या संदर्भात चर्चा करण्यासाठी पुढील आठवडय़ात पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.