आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील कचऱ्याच्या मुद्दय़ावरून शिवसेनेने मनसेला खिंडीत गाठण्याचा चंग बांधला असून मंगळवारी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत महापौर व आयुक्तांच्या दालनात कचरा फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सुरक्षारक्षक व पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलकांचे मनसुबे उधळले गेले असले तरी शिवसैनिकांनी पालिकेच्या आवारात कचरा फेकून गोंधळ घातला. स्वच्छता राखण्यात महापालिका अपयशी ठरल्याने शहरात विविध आजारांचा प्रार्दुभाव वाढत असल्याचा आरोप करत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी महापालिकेत एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. तर या आंदोलनापासून शिवसेनेची ज्येष्ठ मंडळी दूरच राहिल्याचे दिसून आले. शिवसेनेचे आंदोलन म्हणजे निव्वळ ‘स्टंटबाजी’ असल्याची तोफ मनसेने डागली आहे.
अस्वच्छतेमुळे शहरात डासांचा प्रार्दुभाव मोठय़ा प्रमाणात वाढला असून त्याची परिणती डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यात झाली आहे.
खुद्द शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य विभागाला या प्रश्नाची जाणीव झाली. शहरात ठिकठिकाणी पडलेला; परंतु पालिकेने न उचललेला कचरा जमा करण्यासाठी शिवसेनेने स्वच्छता अभियान राबविले आहे. त्यासाठी छोटेखानी टेम्पोची घंटागाडी तयार करून वेगवेगळ्या भागातील कचरा संकलित केला जात आहे. आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी महापौरांच्या प्रभागातील कचरा उचलून शिवसेनेने मनसेला धक्का देण्याचा प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी शिवसैनिकांनी थेट महापालिकेवर धडक दिली.
सकाळपासून गोळा केलेला कचरा घेऊन शिवसैनिक महापालिकेवर धडकले. महापौर व आयुक्तांच्या दालनात कचरा फेकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु, सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावर रोखले. दरम्यानच्या काळात पोलीसही या ठिकाणी पोहोचले. यामुळे आंदोलकांनी पालिकेच्या आवारात कचरा टाकला. हे आंदोलन सुरू असताना आयुक्त आपल्या दालनातच थांबून होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली गेली असली तरी आंदोलकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करून गोंधळ घातला. पालिकेच्या घंटागाडी व्यवस्थेबद्दल अनेक तक्रारी आहेत. अनेक भागात घंटागाडय़ा पोहोचत नाहीत. नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून राहतात. अस्वच्छतेमुळे डेंग्यू व मलेरियासारखे आजार बळावत असल्याचा आरोप नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रमुख महेश बडवे यांनी केला. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे राजीव गांधी भवन मुख्यालयातील कामकाजावर परिणाम झाला. कचऱ्याच्या प्रश्नावर सत्ताधारी मनसेला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना शिवसेनेने केल्याचे अधोरेखित झाले आहे.
हा तर राईचा पर्वत करण्याचा प्रकार
शिवसेनेचे आंदोलन म्हणजे निव्वळ ‘स्टंटबाजी’ असून शहरातील काही अपवादात्मक ठिकाणे वगळता कुठेही कचरा साचत नाही. छोटेखानी टेम्पोद्वारे शिवसेना शहरातील कचरा उचलत असल्याचा दावा करत आहे. किरकोळ कचरा उचलून शिवसेना आंदोलनाद्वारे राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या जवळपास १७० घंटागाडय़ा दररोज नियमितपणे कचरा संकलनाचे काम करतात. जुन्या नाशिक भागातील सराफ बाजार, घनकचरा गल्ली वा वकीलवाडी परिसरांतून शिवसेनेने कचरा उचलून स्वच्छता केल्याचा दावा केला. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. या परिसरातील कुंडीतून दररोज विशिष्ट वेळेला महापालिका कचरा उचलते. फुलबाजार सारख्या भागात कुंडीतून कचरा उचलून नेला जात असला तरी त्या ठिकाणी दिवसभर विक्रेते विक्री न झालेली फुले पुन्हा कुंडीत टाकतात. त्यामुळे अशा काही ठिकाणच्या कुंडीत पुन्हा कचरा साचतो. महापालिकेने प्रभागनिहाय घंटागाडय़ांचे नियोजन केल्यामुळे नगरसेवकांच्या मागणीनुसार हव्या त्या भागात त्या उपलब्ध करून दिल्या जातात. दिवाळीमुळे घरोघरी साफसफाईची कामे मोठय़ा प्रमाणात झाली आहे. त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी असा कचरा दृष्टिपथास पडू शकतो. परंतु, त्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. महापालिका योग्य पद्धतीने कचरा संकलन करत असून शिवसेना प्रसिद्धीसाठी हे आंदोलन करत आहे.
अ‍ॅड. यतिन वाघ, महापौर