इचलकरंजी नगरपालिकेकडे कचऱ्याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यां सुवर्णा शहा यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी चक्क पालिका इमारतीत कचरा आणून टाकला. त्यांनी या भागातील स्वच्छता तातडीने केली जावी, अशी मागणी केली. गुरुवारी झालेल्या या प्रकाराची पालिकेत दिवसभर चर्चा सुरू होती.
इचलकरंजी नगरपालिका आर्थिक टंचाईतून वाटचाल करीत आहे. नव्या विकासकामांसाठी निधी नाही आणि मक्तेदारांमार्फत केल्या जाणाऱ्या कामांची बिले दिली जात नाहीत. त्यामुळे मक्तेदार नगरपालिकेचे काम करण्यास इच्छुक नाहीत. शहरातील स्वच्छता आणि कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले असून ते उचलले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
शहराच्या मुख्य मार्गावरील कॉ. के. एल. मलाबादे चौकामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. या परिसरात सामाजिक कार्यकर्त्यां सुवर्णा शहा या राहतात. घराशेजारीच कचरा कोंडाळा, मुतारी, गटार्स यांची स्वच्छता केली जात नाही. त्याबद्दल अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शहा यांनी गुरुवारी पालिकेत कचरा आणून टाकला. माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शहा यांनी य भागातील नगरसेवक, पालिका प्रशासन तक्रारींचे दखल घेत नसल्याने ही कृती करावी लागत असल्याचे सांगितले. उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी आरोग्याधिकाऱ्यांना या भागातील कचरा त्वरित उचलण्याचा आदेश दिल्यानंतर शहा शांत झाल्या.