शहरातील नागरिकांना विरंगुळ्याच्या उद्देशाने विकसित झालेली उद्याने तरुण-तरुणींच्या चाळ्याची ठिकाणे झाली आहेत. परंतु या प्रकारांना आळा घालण्याचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची बाब पोलिसांनी या संदर्भात पुरवलेल्या आकडेवारीवरूनच सिद्ध झाली आहे.
नागपुरातील बॉटनिकल गार्डन तरुण-तरुणींच्या खुलेआम चालणाऱ्या आक्षेपार्ह चाळ्यांमुळे बदनाम झालेले आहे. याशिवाय याच संदर्भात महाराजबाग, अंबाझरी बगिचा आणि फुटाळा तलाव या ‘कुप्रसिद्ध’ ठिकाणी १ जानेवारी २०१० ते १५ डिसेंबर २०१२ या कालावधीत किती लोक छेडखानी, अयोग्य चाळे आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये सापडले, म्हणजे किती गुन्हे नोंदवण्यात आले याबाबत माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या विचारणेला पोलिसांनी उत्तर दिले आहे. त्यानुसार, यापैकी कुठल्याही ठिकाणी छेडखानी करण्याचा एकही गुन्हा गेल्या तीन वर्षांत नोंदवण्यात आलेला नाही.
बॉटनिकल गार्डनमध्ये अयोग्य चाळे केल्याबद्दल गिट्टीखदान पोलीस ठाण्यात २०१० साली ३, २०११ साली ५७ आणि २०१२ साली २ गुन्हे नोंदवण्यात आले. २०११ सालीच या चाळ्यांचे प्रमाण वाढले होते आणि त्यापूर्वी व नंतर ते कमी झाले असे काही नाही. आजही तिथे हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. परंतु पार्किंग कंत्राटदाराच्या संगनमताने या प्रकारांना संरक्षण दिले जाते. पोलिसांनी एखादेवेळी छापा घातल्यानंतर काही दिवस याला आळा बसतो, परंतु पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असा प्रकार असतो. एकाही गुन्हेगारी कारवाईची येथे नोंद झालेली नाही. अंबाझरी उद्यानात अयोग्य चाळे केल्याबद्दल अंबाझरी पोलीस ठाण्यात २०१० साली ८७, २०११ साली ११८ व २०१२ साली ४८ गुन्हे नोंदवण्यात आले. फुटाळा उद्यानाबाबत हीच संख्या २०१० साली ५, तर २०११ साली ८ अशी होती. फुटाळा तलाव येथील गुन्हेगारीच्या प्रकारांबाबत २०१०, २०११ व २०१२ या साली अनुक्रमे ७, ३० व ३३ गुन्हे दाखल करण्यात आले, तर अंबाझरी उद्यानातील गुन्हेगारीच्या कारवायांबाबत २०१० साली १ व २०११ साली ६ गुन्हे नोंदवण्यात आले. महाराजबाग उद्यानात या तिन्ही वर्षांत छेडखानी, अयोग्य चाळे किंवा गुन्हेगारी कारवाया यांचा एकही प्रकार घडल्याची नोंद सीताबर्डी पोलीस ठाण्याने केलेली नाही. याचा अर्थ कुटुंबांनी जाण्यासाठी हे ठिकाण आदर्श ठरते. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती आठवडय़ातील कुठल्याही दिवशी तेथे जाऊन पाहिल्यास लक्षात येण्यासारखी आहे.
अभय कोलाकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या विचारणेच्या उत्तरात पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे. याशिवाय वरील कालावधीत कौटुंबिक अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये किती गुन्हे नोंदवण्यात आले अशीही माहिती त्यांनी विचारली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल भादंविच्या ४९८ (अ) या कलमानुसार सर्वाधिक म्हणजे २३ गुन्ह्य़ांची नोंद गिट्टीखदान पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्याखालोखाल जरीपटका पोलीस ठाण्यात २१, नंदनवन पोलीस ठाण्यात २०, हुडकेश्वर ठाण्यात १६, अजनी ठाण्यात ११, सक्करदरा ठाण्यात १०, तर वाडी पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल करण्यात आले. पाचपावली ठाण्यात ७, यशोधरानगर ठाण्यात ६, तर अंबाझरी, कळमना व प्रतापनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी ५ गुन्हे दाखल करण्यात आले.
कौटुंबिक गुन्ह्य़ांमध्ये ६४ आरोपींना अटक करून नंदनवन ठाणे आघाडीवर आहे.
जरीपटका पोलिसांनी ५५ जणांना, हुडकेश्वर पोलिसांनी ४७ जणांना, अजनी पोलिसांनी ४० जणांना, गिट्टीखदान व वाडी पोलिसांनी प्रत्येकी ३० जणांना, सक्करदरा पोलिसांनी २७ जणांना, तर प्रतापनगर पोलिसांनी २३ जणांना पकडण्याची कामगिरी केली आहे.