पावसाळ्यात झपाटय़ाने पसरणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात गेल्या वीस दिवसात मेडिकल व आयसोलेशन रुग्णालयात १०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी ४७ रुग्ण मेडिकलमध्ये, २७ रुग्ण महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन्ही रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण विभागात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. गेल्या एक महिन्यात आयसोलेशन रुग्णालयात हिवताप आणि गॅस्ट्रोच्या ३०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात (मेयो) गेल्या पंधरा दिवसात हिवतापाच्या ४४ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
बहुतेक रुग्ण झोपडपट्टी भागातील असल्याचे निदर्शनास आले आहे. डेंग्यूचे रुग्णही आढळून आले आहेत. शहरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांचा त्रास कमी व्हावा म्हणून नागरिक अनेक उपाय करतात, पण पाहिजे तेवढा परिणाम जाणवत नाही. गेल्या आठवडय़ात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये खड्डय़ांमध्ये पाणी साचले.
हीच ठिकाणे डासांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरत आहेत. मेडिकलमध्ये हिवतापाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील खासगी रुग्णालयातही हिवतापाचे रुग्ण दाखल आहेत.
शहरातील विविध भागातील दरुगधीच्या ठिकाणी रोज फवारणी केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला जात असला तरी तरी प्रत्यक्षात फवारणी होताना दिसत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले, पावसाळ्यात हिवताप आणि गॅस्टोचे रुग्ण येत असून त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
ताप, काविळ आणि गॅस्ट्रोची  साथ मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे नागरिकांनी उघडय़ावरील पदार्थ खाणे टाळले पाहिजे. शिवाय परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. गेल्या आठ दिवसात गॅस्ट्रोच्या १२ रुग्णांवर उपचार करण्यात आल.
लहान मुलांबाबत अधिक काळजी घ्या
याबाबत बालरोगजतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले,  पावसाळ्यात लहान मुलांबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांचा प्रार्दुभाव वाढतो. शिवाय शालेय विद्यार्थी उघडय़ावर असलेले पदार्थ सेवन करीत असतात त्यामुळे त्यांच्याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांनी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, पाणी उकळून प्यावे. अंगात ताप आला किंवा उलटय़ा होत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. पावसाळ्यात जास्त लागण होणारा विषाणूजन्य आजार आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतले नाहीत तर हा आजार वेळप्रसंगी जीवघेणाही ठरू शकतो, त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.