‘सिने में जलन आँखो में तूफान सा क्यूं है.. इस शहर में हर शक परेशान सा क्यूं है..’ अशा अनेक गझलांची नवी मुंबईकरांची रविवारची शाम सूरमयी केली होती. निमित्त होते वाशीतील मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाच्या वतीने आयोजित सूरमयी शाम ए गजल या कार्यक्रमाचे. या वेळी जगजीत सिंग, गुलाम अली आणि सुरेश वाडकर यांच्या जादूई सुराने अजरामर झालेल्या गझलांनी ही मैफल सजली होती. आजही या गझलांची भुरळ रसिकांवर कायम असल्याचे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दर्दी रसिकांच्या गर्दीने स्पष्ट केले.  
मंडळाच्या वतीने सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन आणि जुन्या पिढीतील रसिकांना एकत्रित आणले जाते. यामुळे मंडळातील कार्यक्रमांना ज्येष्ठांप्रमाणेच तरुणाईची उपस्थिती अधिक असते. रॉक, पॉप आदी पाश्चात्त्य गायनप्रकारांवर थिरकणाऱ्या तरुणाईला भारतीय संगीतांचीदेखील ओळख व्हावी, यासाठी मंडळाकडून शास्त्रीय संगीत, भावगीत, नाटय़गीत आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमांसाठी रसिकांकडून शुल्क आकारण्यात येत नाही. रविवारी अशाच या सूरमयी शामने रसिकमनावरील पकड अधिक घट केली. जगजीत सिंग यांच्या स्वर्गीय आवाजाने आज प्रेमवीरांच्या ओठांवरील येणारी ‘होश वालो को खबर क्या, बेखुदी क्या चीज है ..इश्क किजे फिरे समझिये जिंदगी क्या चीज है..’ ही विश्वज्योत भट्टाचार्य यांनी सादर केलेल्या गझलने रसिकांच्या मनातील तारा पुन्हा छेडल्या. त्याचप्रमाणे जगजीत सिंग यांची ‘ये दौलत भी ले लो.. ये शोहरत भी ले लो, भले छीनलो मुझसे मेरी जवानी.. मगर मुझ को लौटा दो बचपन का सावन.. वो कागज कि कश्ती, बो बारिश का पानी..’ या भट्टाचार्य यांनी सादर केलेल्या गझलने अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले होते.
सुरेश वाडकर यांच्या मधाळ सुरांनी सजलेली ‘पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली..’ ही गझल विशेष दाद मिळवून गेली. स्वाती चौधरी हिने सादर केलेली ‘चुपके चुपके रातदिन आँसू बहाना याद है.. हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है..’ अशा अनेक गझलांनी गुंफलेल्या संध्याकाळने रसिकांना मोहिनी घातली होती. यात गझलसंध्येला यादगार बनविण्यात गझलगायकांसह निवेदक जाहिर शेख यानेदेखील मुख्य भूमिका बजावली. गझल सादर होण्याच्या मधल्या वेळेत शेखने सादर केलेले शेर रसिकांची दाद मिळवत होते.