पोलीस मुख्यालयात घेण्यात आलेल्या २१ व्या घटक क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सर्वोत्तम पुरुष अॅथलेटिक्स गजानन नरोटे, तर महिलांमध्ये सविता जाधव यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक देण्यात आले.
हॉकी स्पर्धेत छावणी विभागावर पोलीस मुख्यालय संघाने मात केली. बास्केटबॉलमध्ये शहर विभागाने पोलीस मुख्यालयास पराभूत केले. कबड्डीमध्ये छावणी विभाग, तर जलतरणच्या बॅकस्ट्रोकमध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश आंधळे प्रथम, ५० मीटर फ्री-स्टाईलमध्ये प्रकाश चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पुरुषांमध्ये अवधराम सोनकलंकी, गजानन नरोटे, नीलेश सुंदरडे, भगतसिंह गुणावत यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली, तर महिलांमध्ये सारिका गायकवाड, वर्षां लगडपल्ली, संगीता बडगुजर व मनीषा पवार यांनी यश मिळविले. पोलिसांनी मानसिक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावे, या साठी क्रीडा स्पर्धा आवश्यक आहे. मैदानावर उतरत नाही, तोपर्यंत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही, असे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पारितोषिक वितरण सोहळ्यात सांगितले. विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली.