कष्टकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वस्त आणि जेनेरिक औषधे देणाऱ्या जनलोक मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन रिक्षापंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. नागरिक सहकारी भांडार, हमाल पंचायत आणि आरोग्य सेनेच्या वतीने हे दुकान सुरू करण्यात आले आहे.
यावेळी एस. एम. जोशी मेमोरिअल मेडिकल असोसिएशन व सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष भाई वैद्य, आरोग्य सेना आणि सोशालिस्ट युवजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद कपोते उपस्थित होते.
मार्केट यार्ड येथील हमालनगर येथे हे दुकान सुरू करण्यात आले आहे. औषधांबरोबरच रुग्णांना लागणारे साहित्य अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध तपासण्या करण्यासाठीचे सेंटर येत्या काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचेही डॉ. वैद्य यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. आढाव म्हणाले, ‘‘हमालांना फक्त चार पैसे मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट नसून त्यांचे जीवनमान उंचावणे आणि रोजच्या गरजा भागवणे हेही आमचे कर्तव्य आहे. औषधांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत, तसेच बाजारात बनावट औषधेही मोठय़ा प्रमाणात येत आहेत. त्यासाठी सर्वानी जागरूक राहणे आवश्यक आहे. याला आळा घालण्यासाठीच जेनेरिक औषधांचे दुकान सुरू करण्याची गरज आहे.’’
भाई वैद्य म्हणाले, ‘‘आज कुपोषणामुळे असंख्य बालकांचा मृत्यू होत आहे. औषधोपचार हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हे लक्षात घेऊन जनेरिक औषधांचे दुकान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य माणसाला स्वस्तात आणि दर्जेदार औषधे मिळू शकतील.’’