News Flash

जगण्याचं नवं भान देणारं‘गेट वेल soon’

नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या जोडीने माणसाच्या जगण्याशी थेट भिडणारी ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘चाहूल’ आणि ‘सेलिब्रेशन’ ही आशयसंपन्न नाटक देऊन मराठी रंगभूमी समृद्ध

| July 7, 2013 10:28 am

नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या जोडीने माणसाच्या जगण्याशी थेट भिडणारी ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘चाहूल’ आणि ‘सेलिब्रेशन’ ही आशयसंपन्न नाटक देऊन मराठी रंगभूमी समृद्ध करण्याचं काम केलं आहे. म्हणूनच दहा वर्षांच्या खंडानंतर आलेल्या ‘गेट वेल soon’ या त्यांच्या नव्या नाटकाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल व काहीतरी वेगळं पाहायला मिळण्याची अपेक्षा असणं स्वाभाविक होतं. या अपेक्षांना ते खरे उतरले आहेत. माणसाचं जगणं, त्यातले गुंतागुंतीचे कंगोरे, भवतालाचे त्याच्यावर होणारे परिणाम हा प्रशांत दळवी यांचा नेहमीच चिंतनाचा विषय राहिलेला आहे. ‘गेट वेल २ल्ल’मध्येही त्यांनी ‘व्यसनाधीनता’ या विषयाचा एका वेगळ्याच कोनातून धांडोळा घेतला आहे. व्यसनी व्यक्तीकडे ज्या तिरस्कृत नजरेनं समाजाकडून पाहिलं जातं त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या, सहानुभूतीपूर्ण, परंतु वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं आहे. व्यसनाचे संबंधित व्यक्तीच्या शरीर-मनावर होणारे परिणाम आणि त्यापायी त्याच्या जवळच्यांची होणारी परवड एवढय़ापुरतंच हे नाटक सीमित नाही, तर त्यापलीकडे जात ज्यांच्याशी त्या (व्यसनी) व्यक्तीचा काहीही संबंध नाही अशी माणसंही त्याच्या व्यसनापायी कशी भरडली जातात, उद्ध्वस्त होतात, हा नवाच कोन प्रशांत दळवी यांनी यात हाताळला आहे. त्यामुळे हे नाटक व्यसनाधीनतेवर चाकोरीबद्ध भाष्य करण्यापुरतंच मर्यादित न राहता अधिक व्यापक पातळीवर जातं आणि त्याद्वारे आपलं जगण्याबद्दलचं भान वाढवतं.. एक समृद्ध जीवनानुभव देतं.
खरं तर ही एक केस स्टडी आहे. व्यसनमुक्तीचं कार्य करणारे डॉ. आनंद यांच्याकडे आलेली एक इंटरेस्टिंग केस. अत्यंत बुद्धिमान, परंतु व्यसनात वाहवत गेलेल्या आणि आपल्या व्यसनाचं अत्यंत हुशारीनं समर्थन करणाऱ्या प्रतीक नावाच्या पेशंटची ही कहाणी. एका कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर असलेला प्रतीक सोशल ड्रिंकिंगची मर्यादा ओलांडून कधी त्याच्या अधीन होतो, हे त्याचं त्यालाही कळत नाही. लतिकासारखी समंजस बायको आणि दोन गोड मुलं, उत्तम चाललेला संसार आणि करिअर असं सगळं व्यवस्थित असताना प्रतीक दारूच्या व्यसनात वाहवत जातो. इतका, की शेवटी त्याला जबरदस्तीनं डॉ. आनंद यांच्याकडे उपचाराकरता आणलं जातं. इथून प्रतीकचा ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून व्यसनमुक्तीकडे होणारा प्रवास, मधेच पुनश्च त्याचा पाय घसरणं, डॉक्टरांच्या समुपदेशनामुळे आणि सतत स्व-विश्लेषण करण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे त्याचं पुन्हा भानावर येणं.. हे एकीकडे घडत असतानाच नाटकाला अकस्मात एक वेगळंच वळण मिळतं.
डॉ. आनंद त्यांची मुलाखत घ्यायला आलेल्या पत्रकार नीराला प्रतीकची ही कहाणी कथन करत असतात. इतक्यात ती भयंकर अस्वस्थ होते आणि पर्स उघडून वेदनाशामक गोळ्यांचा बकाणाचा बकाणा तोंडात घालते. डॉ. आनंदना क्षणभर काही कळत नाही. पण लगेचच भानावर येत ते तिला तिथल्या तिथे मुक्तांगणमध्ये अ‍ॅडमिट व्हायला सांगतात. पण ती त्यास नकार देते. आपल्याला एक घरगुती प्रॉब्लेम आहे, तो आधी निस्तरते आणि मग तुमच्याकडे अ‍ॅडमिट होते, असं सांगून ती निघून जाते. जाताना बेचैन मन:स्थितीत प्रतीकच्या पत्रांची फाइल तिच्या पर्समधून ती घेऊन जाते.
व्यसनाच्या विळख्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या प्रतीकला अमेरिकेत एक जॉब ऑफर येते आणि लगेचच तो ती संधी घेतो. जाताना डॉक्टरांना आणि लतिकाला आपण पूर्णपणे संयम पाळू, दारूला स्पर्शही करणार नाही, असं आश्वासन देतो. डॉक्टर त्याला आपल्याला नेहमी पत्रं पाठवत राहा आणि त्यांतून तिथल्या घडामोडी शेअर कर, असं सुचवतात. त्याप्रमाणे त्यांचा पत्रव्यवहार सुरू होतो. सुटीत तो लतिकाला अमेरिकेत बोलावून घेतो. परंतु ती तिथं पोहोचल्यावर मात्र तो तिच्याशी अत्यंत तुटकपणे वागतो. लतिकाला तो असं का वागतोय, कळत नाही. त्याबद्दल ती डॉक्टरांशी बोलते. त्यांनाही नीटसा अंदाज येत नाही. कारण पत्रांतून प्रतीकचं सगळं व्यवस्थित चाललंय असं त्यानं कळवलेलं असतं. व्यसनमुक्तीनंतरच्या रितेपणाविषयीही त्यानं डॉक्टरांशी मनमोकळेपणानं चर्चा केलेली असते. त्याबाबतीत त्यांचा सल्ला घेतलेला असतो. डॉक्टरांची अशी टेलिफोन थेरपीही व्यवस्थित सुरू असते. मग अचानक असं काय घडलं, की प्रतीकनं लतिकाशी असं तुसडेपणानं वागावं? दोघांनाही यामागचं कारण कळत नाही.
प्रतीकनं लतिकाला स्वत:च अमेरिकेला बोलावून नंतर तिच्याशी असं तुटक वागण्याचं कारण काय? ही नीरा नेमकी कोण असते? तिला प्रतीकच्या पत्रांमध्ये इतका रस का?.. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याकरता ‘गेट वेल २ल्ल’ प्रत्यक्ष पाहणंच उचित ठरेल.
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या ‘मुक्तिपत्रे’ या पुस्तकावर हे नाटक आधारलेलं आहे. परंतु यातलं नीरा हे पात्र मात्र नाटककार प्रशांत दळवी यांची स्वतंत्र निर्मिती आहे. या पात्रामुळे नाटकाला एक वेगळीच मिती (्िरेील्ल३्रल्ल) प्राप्त झाली आहे. मानवी मनोव्यापार आणि जगण्यातल्या गुंतागुंतीच्या अज्ञात पैलूला हे नाटक सामोरे जातं. ‘ध्यानीमनी’ व ‘सेलिब्रेशन’मध्ये योजलेलं धक्कातंत्र प्रशांत दळवी यांनी इथंही चपखलपणे वापरलं आहे. वरवर पाहता जरी हे व्यसनमुक्तीवरचं नाटक वाटत असलं तरी मानवी व्यवहारांतली व्यामिश्रता, त्यातले अदृश्य कंगोरे मांडण्याचं कामही ते करतं. साधी-सोपी वाटणारी, परंतु तीक्ष्ण बुद्धिगामी मांडणी हेही या नाटकाचं वैशिष्टय़. मुलाखत, फ्लॅशबॅकमधील घटना आणि पत्ररूप संवाद अशा त्रिविध फॉर्ममध्ये हे नाटक खेळवलं आहे. हा रचनेतला गुंता प्रेक्षकांना अजिबात जाणवू नये याची खबरदारी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी घेतली आहे. सुरुवातीला डॉक्टर आनंद आणि नीरा यांच्यातलं मुलाखतवजा संभाषण सुरू असता आपण व्यसनमुक्तीवरचं प्रबोधनपर व्याख्यान ऐकतो आहोत असं वाटत असतानाच नाटक प्रतीकपाशी येतं आणि मग या ‘लव्हेबल रास्कल’च्या आयुष्यात आपण ओढले जातो. तरीही हे कुणा एका व्यसनी, पण बुद्धिमान व्यक्तीचं आयुष्य आपण त्रयस्थपणे पाहतो आहोत असंच वाटतं. त्यातली वळणंवाकणं अपेक्षिततेच्या मार्गानं जात राहतात. परंतु अकस्मात नीराच व्यसनाधीन असल्याचं भयंकरवास्तव समोर येतं आणि आपल्याला पहिला धक्का बसतो. त्यानंतर धक्क्य़ावर धक्के बसत राहतात. नीरा ही प्रतीकची एकेकाळची प्रेयसी असेल, त्यांचं क्वचित ‘वन नाइटअफेअर’ असेल, वगैरे आपले ठोकताळे पार उद्ध्वस्त करत एक भलतंच अतक्र्य वास्तव समोर उभं ठाकतं आणि आपण पुरते हादरून जातो. असंही घडू शकतं? काही क्षणांत त्या धक्क्य़ातून आपण बाहेर येतो अन् आता प्रतीक काय करणार, असा गहन प्रश्न आपल्याला पडलेला असतानाच तो ज्या तऱ्हेनं त्यातून बाहेर येतो, त्यातून नाटकाची निखळ वैचारिक मांडणी प्रत्ययाला येते. जिच्याशी आपला काहीही संबंध नाही अशी व्यक्तीही आपल्या हातून नकळत घडलेल्या एखाद्या कृतीनं उद्ध्वस्त होऊ शकते? आयुष्यातून उठू शकते? ही कल्पनाच किती भयंकर आहे! ‘गेट वेल २ल्ल’मध्ये प्रशांत दळवी यांनी मांडलेला हा मुद्दा नाटक संपलं तरी आपला पाठलाग सोडत नाही. इथं एक गमतीची गोष्ट नमूद करायला हवी. ती म्हणजे जुन्या नाटककारांसारखीच दळवींनीही या नाटकात सुभाषितवजा वाक्यं पेरली आहेत. उदा. डॉ. आनंद व्यसनींचे प्रकार सांगताना हाताच्या पाच बोटांचा जो दाखला देतात, तो याच प्रकारात मोडतो. किंवा प्रतीकला उपदेशाचा डोस पाजताना ते म्हणतात- ‘व्यसनमुक्ती म्हणजे फक्त व्यसनाची अखेर नव्हे, तर व्यसनाबद्दलच्या अज्ञानापासूनची मुक्ती!’ वगैरे. व्यसन- मग ते अंमली पदार्थाचं असो की पैशाच्या हव्यासाचं; किंवा आपलं मोठेपण मिरवण्याचंही- ते घातकच. लेखकानं नाटकात अधूनमधून आपलं जीवनविषयक चिंतनही खुबीनं पेरलं आहे; ज्यानं जगण्याचं एक नवं भान मिळतं.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रत्येक पात्राचं प्रयोजन जाणून अनावश्यकतेला पूर्ण फाटा दिलेला आहे. त्यामुळेच एक गोळीबंद प्रयोग पाहिल्याचं समाधान मिळतं. रचनेच्या दृष्टीनंही सादर करायला अवघड असं हे नाटक; परंतु त्यांनी ते लीलया पेललं आहे. अचूक पात्रनिवडीत या नाटकाचं र्अध यश आहे. संदीप मेहता म्हणजेच डॉ. आनंद यात तीळमात्र शंका नाही. स्वप्नील जोशी यांची प्रचलित इमेज आणि त्यांनी साकारलेला यातला प्रतीक यांचं नातं स्वीकारणं जड जात असलं तरी त्याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शकाचं, तसंच स्वत: स्वप्नील जोशी यांचंही आहे! पात्रांच्या तोंडचे दीर्घ संवाद त्यातल्या भावनिक, वैचारिक अनुबंधासह कलाकारांकरवी सर्व स्तरांतल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवणं, हे तसं कर्मकठीणच. परंतु चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकरता काहीच असाध्य नसतं याचा प्रत्यय इथंही येतोच. नाटकातील व्यक्त-अव्यक्त आशय अधिक टोकदार करत उत्कर्षबिंदूप्रत नेण्याचं त्यांचं कौशल्य भन्नाटच!
नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी चार वेगवेगळी स्थळं लवचिकरीत्या साकारली आहेत; जेणेकरून त्यांतली अदृश्य भिंत तोडत नाटकाच्या गुंतागुंतीच्या रचनेला योग्य तो अवकाश उपलब्ध होईल. भावानुकूल प्रकाशयोजनेची जोडही त्यांचीच. मिलिंद जोशी यांनी नाटय़ांतर्गत मूड्स अधोरेखित करण्यापुरतंच संगीत योजलं आहे. प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषेद्वारे पात्रांना बाह्य़ व्यक्तिमत्त्व दिलं आहे.
संदीप मेहता यांनी यातले डॉ. आनंद मूर्तिमंत वठवले आहेत. समुपदेशकाचा पेशन्स, भिन्न पिंडप्रकृतीचे पेशंट्स हाताळतानाची कसरत, डॉक्टर-पेशंट संबंधातला सहअनुभूत दृष्टिकोन त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेनं व्यक्त केला आहे. स्वप्नील जोशी यांनी रंगमंचावरील पदार्पण आपल्या प्रचलित इमेजला धक्का देत साजरं केलं आहे. प्रतीकची अवस्थांतरं, त्यातले चढउतार, भावनिक आंदोळ, त्याचं स्वत:ला सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून सतत न्याहाळणं.. हे सारं त्यांनी प्रत्ययकारीतेनं दाखवलं आहे. विशेषत: त्यांच्या अखेरच्या बुद्धिगम्य युक्तिवादातला अनुभवांतून आलेला ठोसपणा मनाला चांगलाच भिडतो. व्यसनासक्त नीराचं अध:पतन, त्यासाठी तिनं दुसऱ्याला जबाबदार धरणं आणि सर्वाचीच आयुष्यं उद्ध्वस्त व्हायला कारणीभूत होणं.. हा प्रवास समिधा गुरू यांनी त्यातल्या भावकल्लोळांसह उत्कटतेनं पोहोचवला. माधवी कुलकर्णी यांनी लतिकाचं समंजसपणा रूप नेमकेपणी टिपलंय. अन्य कलाकारांचीही साथ मोलाची आहे. आपल्या जीवनजाणिवा प्रगल्भ करणारं हे नाटक चुकवू नये असंच आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 10:28 am

Web Title: get well soon
टॅग : Loksatta,Marathi News
Next Stories
1 शांत, नि:शब्द, करुण प्रेमकथा
2 ‘द ह्य़ूमन फॅक्टर’चा आज खेळ
3 रहस्यमय पण चमत्कारिक
Just Now!
X