राज्यात व जिल्ह्य़ात दुष्काळी परिस्थिती जाणवत असताना आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये (ता. नगर) पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे. हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी आपल्या जलसंधारणातील कामाच्या अनुभवाचा फायदा राज्यातील दुष्काळी गावांना देण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याचे नियोजन कसे करावे याची माहिती दुष्काळी गावांना देण्यासाठी हिवरेबाजारचे ग्रामस्थ गावोगाव ‘जलदिंडी’ काढणार आहेत. गावातील महिलांचाही त्यात पुढाकार असणार आहे. दुष्काळी गावातील महिला मंडळ पुढे आल्यास हिवरेबाजारच्या महिला ते गाव जलसंधारण कामासाठी दत्तकही घेणार आहेत.
अनेक ठिकाणची तरुणाई काल जेव्हा ‘थर्टी फर्स्ट’ साजरी करण्यात रमली होती, त्याचवेळी हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी काल रात्री विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. गेल्या वर्षभरात ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, त्यातील त्रुटी, आगामी काळातील पाणी नियोजन, गावातील पाण्याचा ताळेबंद मांडणे, तसेच गावातील अडिअडचणींवर चर्चा करण्यासाठी ही सभा होती. राज्याच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, भूजल सर्वेक्षण अधिकारी गोसके यांच्या प्रमुख उपस्थितीत व सरपंच सुनीता पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. ग्रामस्थांनी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी परवडणारे नसल्याने ते नाकारण्याचा निर्णय घेतला. गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात यंदा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला, त्यामुळे आता गावाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली, त्यादृष्टीनेही चर्चा करण्यात आली. दुष्काळी पाश्र्वभूमीवर राबवल्या जात असलेल्या सप्तसुत्रीचा आढावा घेण्यात आला. गावात कोणाला नवे घर बांधायचे असल्यास त्याला ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. शिवार वाहतुकीसाठी शेतातील रस्त्यांचा, तसेच गेल्या वर्षभरात झालेल्या जमीन मोजणीचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन गावातील पिण्याच्या पाण्याचे व चाऱ्याचे नियोजन करण्यात आले. गोसकी यांनी गावातील पाण्याचा ताळेबंद सादर केला. पोपटराव पवार, अ‍ॅड. सुभाष भोर यांच्यासह ग्रामस्थ हरिभाऊ ठाणगे, विठोबा ठाणगे, उत्तम संबळे, सीताराम भालेकर आदींनी विविध सूचना केल्या.
सभेत सादर करण्यात आलेला पाण्याचा ताळेबंद असा-
एकूण पडलेला पाऊस- १९८ मिमी.
उपलब्ध पाणी- १९३.४१ किलो लिटर्स.
बाष्पीभवन, वाहून जाणारे पाणी- ६७.६९ किलो लिटर्स
जमिनीवरील पाण्याचा साठा- ९.६७ किलो लिटर्स
जमिनीत मुरणारे पाणी- १९.३४ किलो लिटर्स
जमीन ओलाव्यातील पाणी- ५८.०२ किलो लिटर्स
जलसंधारणामुळे मुरणारे पाणी- २८.९ किलो लिटर्स
गावच्या वापरासाठी उपलब्ध पाणी- ११५.९७ किलो लिटर्स
पिण्यासाठी उपलब्ध पाणी- ३.४१ किलो लिटर्स
शेतीसाठी उपलब्ध पाणी- १०५.२३ किलो लिटर्स
बिगर शेती वापरासाठी- २.३२ किलो लिटर्स
शिल्लक पाणीसाठा- ४.९८ किलो लिटर्स
ग्रामस्थांनी मार्चनंतर कोणतेही पीक न घेता पाणी पिण्यासाठी वापरावे व मे नंतर उपलब्ध पाण्यातून केवळ ठिबकवर भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय झाला.
मुलींना करणार संरक्षणसिद्ध
दिल्लीत तरुणीवर झालेल्या भीषण अत्याचाराच्या घटनेचा ग्रामसभेत निषेध करण्यात आला. मुलींमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी व संस्कारक्षम बनवण्यासाठी खेळाचे मैदान व ग्रंथालयाची सवय लावण्याचा  निर्णय घेण्यात आला. त्यासाठी गावात इनडोअर स्टेडियम उभारले जात आहे. तेथे इतर खेळांबरोबरच मुलींना कुस्ती व ज्युदोचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळा, कॉलेजमध्ये जाताना एकत्रित जावे, १२ वीपर्यंत मोबाईल वापरु नये, पाश्चात्य पद्धतीचे अनुकरण करु नये, केबलवरील सिरियलच्या आहारी जाऊ नये अशा विविध सूचना ग्रामस्थांनी केल्या.