घारापुरी महोत्सवाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू न झाल्यामुळे पुढील सांस्कृतिक कार्यक्रम उशीरा सुरू झाले. परिणामी त्याचा फटका नृत्यमैफलीच्या कार्यक्रमाला बसला. आणि दहाच्या वेळेच्या मर्यादेमुळे तो अर्धवट बंद करावा लागल्याने रसिकांचा हिरमोड झाला. ३ आणि ४ मार्च असे दोन दिवस महाराष्ट्र पर्यटन विकास मंहामंडळातर्फे घारापुरी बेटावर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार ३ मार्च रोजी उद्घाटन सोहोळा ६ वाजता सुरू होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात सव्वासात-साडेसातला उद्घाटन सोहळा झाला आणि त्यानंतर सांस्कृतिक/संगीत मैफल सुरू झाली. कार्यक्रमाची सांगता विविध नृत्यशैलीतील नृत्यप्रकारांनी होणार होती. मात्र हा कार्यक्रम सुरू असतानाच दहा वाजल्याने वेळेच्या मर्यादेमुळे कार्यक्रम अर्धवट थांबवावा लागला.कार्यक्रमासाठी १०ची मर्यादा पाळली गेली पाहिजेच. त्याबद्दल काही म्हणायचे नाही. पण हा नियम काही अचानक केलेला नाही. तुम्हाला जर हे माहीत होते, तर नियोजित वेळेत कार्यक्रम का सुरू केला नाही. यापुढे तरी असे सांस्कृतिक कार्यक्रम कोणासाठी न थांबता ठरलेल्या वेळेत सुरू करावे, अशी अपेक्षा कार्यक्रमाला उपस्थित असलेले रसिक प्रेक्षक डॉ. महेश बेडेकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. दरम्यान, या संदर्भात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुळात सांस्कृतिक कार्यक्रम/ संगीत मैफल ७ ते १० या वेळेत होणार होती. ठरलेल्या वेळेपेक्षा ती पंधरा ते वीस मिनिटे उशिरा सुरू झाली. तसेच या वेळी सादर झालेला ‘फ्युजन’चा एक कार्यक्रम लांबल्याने त्यापुढील नृत्यमैफलीचा कार्यक्रम उशीरा सुरू झाला आणि वेळेच्या मर्यादेमुळे तो अर्धवट बंद करावा लागला. झाल्या प्रकाराबद्दल आम्ही रसिक आणि कलाकार यांची दिलगिरी व्यक्त केली. या पुढे असे कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू होतील आणि रसिकांचा हिरमोड होणार नाही, त्याची काळजी घेऊ.