महावितरण विभागाचे सर्वेक्षण
मुंबई आणि उरणच्या मध्यभागी असलेल्या घारापुरी बेटाच्या विकासासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामध्ये वीजपुरवठाचे कामही करण्यात येणार आहे. नुकताच महावितरणच्या एका पथकाने वीजपुरवठय़ासाठी घारापूरी बेटाचा सव्‍‌र्हे केला. परंतु या सव्‍‌र्हेनंतर पूर्वानुभव पाहता घारापुरीच्या अंधाराचे जाळे नक्की दूर होणार का, असा प्रश्न आता येथे विचारला जाऊ लागला आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही येथे वीज पोहोचलेली नाही.
मुंबई व उरण यांच्या मध्यभागी असलेले घारापुरी हे बेट आहे. या बेटावर असलेल्या काळ्या पाषाणातील महेश मूर्ती तसेच शिवलिंगामुळे घारापुरी हे देशातील एक मुख्य पर्यटनस्थळ म्हणून त्याची ओळख संपूर्ण जगात आहे. या बेटावर मोराबंदर, शेतबंदर व राजबंदर अशी एकूण तीन गावे आहे. साधारणत: ९५० लोकसंख्या असलेल्या या गावात तीनशे घरे असल्याचे सांगितले जाते. मात्र गावातील नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली वीज स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही पोहोचलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवनमानावर व शिक्षणावरही परिणाम झाला आहे. सध्या साठ टक्केपेक्षा अधिक गावातील रहिवाशी हे मुलांच्या शिक्षणासाठी उरण तालुक्यात वास्तव्य करीत आहेत. यातील बहुतांशी नागरिकांचा व्यवसाय हा घारापूर येथे दररोज येणाऱ्या हजारो पर्यटकांवर अवलंबून आहे. त्याकरिता त्यांना घारापुरी ते उरण असा जलमार्गाचा दररोज प्रवास करावा लागत आहे.
घारापुरीला वीजपुरवठा करण्यासाठी यापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्पाचीही उभारणी करण्यात आलेली होती. मात्र हा प्रकल्प अल्पजीवी ठरला. पूर्वीच्या राज्य व केंद्राच्या सत्तास्थानी आलेल्या सत्ताधाऱ्यांनी घारापुरीला वीजपुरवठा करण्यासाठी योजना जाहीर केल्या, त्यासाठी सव्‍‌र्हेही केले. मात्र घारापुरीच्या वीजपुरवठय़ाच्या घोषणा या कागदावरच राहिल्या. आता नव्या सरकारने पुन्हा एकदा घोषणा केली आहे. या घोषणेची तरी अंमलबजावणी होईल का याबाबत आता येथे चर्चा आता रंगू लागली आहे.

समुद्राखालून किंवा टॉवर टाकून वीजपुरवठा
घारापुरीला वीजपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेल्या सव्‍‌र्हेसंदर्भात उरण महावितरणचे साहाय्यक अभियंता उपेंद्र सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत घारापुरी परिसराची पाहणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. येथे वीजपुरवठा करण्यासाठी घारापुरी शेजारी असलेल्या न्हावा येथून समुद्राखालून किंवा टॉवर टाकून वीजपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे, असे उपेंद्र सिन्हा यांनी या वेळी सांगितले.