सांस्कृतिक कार्यक्रमांचे एक समृद्ध व्यासपीठ अशी ख्याती असलेल्या ठाण्यातील इंद्रधनू संस्थेचा वार्षिक रंगोत्सव यंदा ६ आणि ७ डिसेंबर रोजी अनुक्रमे डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह तसेच गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार ५ डिसेंबर रोजी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीचा पूर्वघोषित कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाला आहे. त्यामुळे त्या दिवशी होणारा युवोन्मेष पुरस्कार सोहळा आता शुक्रवार ६ डिसेंबर रोजी होईल. यंदा ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक अभिजित घोरपडे यांना युवोन्मेष पुरस्कार दिला जाणार आहे.
पुरस्कार वितरणानंतर डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ‘गजल की रात, गजल की बात’ ही विशेष मैफल सादर होणार आहे. शायर कवी आणि संगीतकारांशी गझलविषयी गप्पा, शेरोशायरी आणि गझल गायन असे या मैफलीचे स्वरूप आहे. संगीतकार कौशल इनामदार, शायर संदीप गुप्ते, वैभवी जोशी यांचा या मैफलीत विशेष सहभाग असेल. कमलेश भडकमकर यांचे संगीत संयोजन तर निवेदन धनश्री लेले करणार आहेत. हेमा उपासनी, कनकश्री भट, मधुरा कुंभार, सुचित्रा भागवत, कामोद आरबिडवार आणि माधव भागवत हे गायक कलावंत गझल सादर करणार आहेत.
शनिवार ७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता गडकरी रंगायतन येथे ‘उंच माझा सुरांचा झोका’ ही सध्याच्या आघाडीचा संगीतकार नीलेश मोहरीर यांच्या सांगीतिक प्रवासावर आधारित मैफल सादर होईल. ‘राधा ही बावरी’, ‘होणार सून मी या घरची’, ‘कुलवधू’ आदी अनेक मालिकांची शीर्षकगीते त्यांच्या नावावर आहेत. नीलेश मोहरीर आणि सत्यजित प्रभू संगीत संयोजन करणार आहेत. मंगेश बोरगावकर, धवल चांदवडकर, जयदीप बगवाडकर, माधुरी करमरकर, जान्हवी प्रभू-अरोरा आणि सावनी रवींद्र हे गायक कलावंत त्यात भाग घेणार आहेत. या मैफलीदरम्यान नीलेश मोहरीर यांना श्रीधर फडके यांच्या हस्ते कै. सुधीर फडके पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 9:02 am