घारापुरी (एलिफंटा) येथील नागरिकांच्या तसेच तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे दिवे लावण्यात आले आहेत. तसेच पर्यटकांच्या बोटींसाठीची जेटीही अद्ययावत करण्यात येत आहे.
घारापुरी बेटावर पर्यटकांची सतत वर्दळ असते. या बेटावर तीन ते चार हजार लोकवस्ती असून पर्यटनावरच त्यांची उपजीविका होते. वर्षांला या बेटाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ३० ते ४० लाख असून केवळ दिवसाच तेथे बोटीने जाणे शक्य असते. इतरवेळी येथील रहिवाशांनाही जेटीकडे जाणे अंधारामुळे शक्य नसते. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळानेरात्रीही बोटी चालविण्यासाठी जेटी अद्ययावत करण्याची योजना आखली असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक सहकार्य घेतले आहे. जेटी अद्ययावत करणे, जेटीकडे जाण्याच्या मार्गावर सौर दिवे लावणे, संपूर्ण बेटावर मार्गदर्शक नकाशे लावणे आणि डिझेल जनरेटर लावून प्रत्येक घरात एक दिवा लावणे यासाठी केंद्र सरकारकडून चार कोटी तर राज्य सरकारकडून अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
घारापुरी बेटावर वीजेचे दिवे लावण्यासाठी वीज पुरवठा करणारी यंत्रणा मुंबईहून समुद्रातून पुरवावी लागणार आहे. मात्र त्यास नौदल आणि महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने अद्याप परवानगी दिली नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सध्या विचार सुरू आहे. त्यातूनच प्रायोगिक तत्त्वावर सौर उर्जेवर चालणारे दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिव्यांसाठी लागणाऱ्या बॅटरीची पाच वर्षांंची हमी देण्यात आल्याचे पर्यटन महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
सध्या या जेटीवर ७० सौर दिवे लावण्यात आले आहेत. सायंकाळनंतर हे दिवे प्रकाशमान होतात व सहा ते सात तास ते प्रकाशमान राहतात. लवकरच तेथे मानवी हालचालींनुसार दृश्यमान होणारे सौर दिवे लावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारचे दिवे लावण्यात आल्यावर संपूर्ण रात्रभर येथील जेटीवर दिव्यांचा प्रकाश उपलब्ध होईल आणि रात्रीही घारापुरीला जाण्याची पर्यटकांची सोय होईल.