कोल्हापूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी उद्या मंगळवारी ‘जीन्स डे’ साजरा करणार आहेत. नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरण व स्त्रियांवरील अत्याचाराच्या वाढत्या प्रकारांना महिलांचा पोशाख कारणीभूत आहे, असे म्हणणाऱ्या प्रवृत्तींना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता बदलली जावी, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनी उद्या जीन्सचा पेहराव करणार आहेत. ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.    
गेल्या महिनाभरात देशभरात महिलांवरील बलात्काराच्या अनेक घटना उघडकीस आल्या. त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या, छळाचे अनेक गुन्हेही चर्चेत राहिले. स्त्रियांवरील अत्याचार कसे रोखता येतील, याचे विचारमंथनही होत राहिले. स्त्रियांवरील बलात्कारासारखे प्रकार रोखायचे असतील, तर त्यांनी जीन्ससह आधुनिक पोशाख वापरणे बंद करणे गरजेचे आहे, अशा स्वरूपाचे मतही काही जणांनी मांडले. मात्र या प्रकारच्या भूमिकेस कोल्हापुरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून विरोध होत आहे. आधुनिक पेहरावामुळे बलात्कार होत नसून पुरुषी हुकूमशाही प्रवृत्ती त्यास कारणीभूत आहे, असे या युवतींचे म्हणणे आहे. आपल्या म्हणण्याला समर्थन करण्यासाठी त्यांनी जीन्स डे साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मंगळवारी महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह एकूण शहरातील सर्व युवती जीन्समध्येच वावरताना दिसणार आहेत.