मुली या हिंदूंची जननशक्ती असून ती शाबूत राहिली तरच भारतीय संस्कृती टिकून राहील. त्यासाठी त्यांच्यावर उज्ज्वल भारतीय संस्कृतीचे संस्कार करा. त्यांना धर्मरक्षण करणाऱ्या जिजाऊ बनवा, पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करू नका, असे कळकळीचे आवाहन तुटलेले संसार जुळवण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅड. अपर्णाताई रामतीर्थकर यांनी केले.
छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे सायंटिफिक सभागृहात आयोजित समारंभात यंदाचा ‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मेळघाटमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे होते.
आजची आई बदलल्याने समाजात अनेक समस्या निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधून अपर्णाताई म्हणाल्या, आजची आई नऊवारी साडीवरून जिन्स पॅन्टवर आली आहे. हातातल्या बांगडय़ा व कपाळावरील कुंकूही हरवले आहे. आईचा पदरच हरवल्याने भारतीय संस्कारच दुरापास्त झाले आहे. भारतीय स्त्रीचे अस्तित्व हे पोषाखावर अवलंबून असते. आईचे धर्माचरण बदलल्याने आजच्या तरुणी धर्म बदलवयास लागल्या आहेत. मुलींना धर्माची जाणीव नाही. त्यामुळे महाराष्ट्रात दररोज एक तरुणी धर्म बदलवत आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी आता आईनेच पुढाकार घेतला पाहिजे.
सर्वच संकटे धर्मावर आली असताना आम्ही मात्र शांत बसलो आहोत. करिअरच्या नावाखाली आम्ही आमचा धर्मच विसरू लागलो आहोत. मुलांना पैसा तयार करणारी यंत्रे तयार करू लागलो आहोत. मुलाला पहिलीपासूनच इंग्रजीचे शिक्षण देत आहोत. इंग्रजी यायला पाहिजे, पण त्याचा अट्टाहास नको. आज आम्ही इंग्रज तयार करत आहोत. पाश्चिमात्यांचे जे काही चांगले असेल ते घ्या, परंतु अंधानुकरण करू नका. आईच्या ऐवजी मम्मी आली आहे, तर बाबाऐवजी डॅडी आले आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली आमच्या मुली पळवून नेल्या जात आहेत. धर्मासाठी प्रेम करा व नंतर त्यांना बाटवा व विका, असा फतवाच काढण्यात आला आहे. गेल्या वर्षी अकोला जिल्ह्य़ातून ८५०, तर नागपूरमधून ११५० मुली पळवून नेण्यात आल्या. गेल्या महिन्यात वाशिममधून ६९ मुली पळवून नेल्या. यानंतर या मुली आपल्या आई-वडिलांनाही ओळखत नाहीत, असेही अपर्णाताईंनी यावेळी सांगितले.
चूल, मूल, सासरची आणि माहेरच्या मंडळींना सांभाळूनच आपले स्वतचे अस्तित्व निर्माण करा. हेच तुमचे कर्तव्य आहे. जिवंतपणी सासू-सासऱ्यांना जेऊ घाला, असा सल्लाही त्यांनी दिला. जगात भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. घराघरात शिवबा निर्माण होण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आईने आईसारखेच वागले पाहिजे, शिकले पाहिजे व तसे राहिले पाहिजे. चारित्र्य महत्त्वाचे आहे. प्रत्येक घराला उंबरठा आहे. तेव्हा प्रत्येक तरुणी आणि महिलांनी हा संस्काराचा उंबरठा ओलांडू नये. महिलांबरोबरच घरातील कर्ते पुरुषही समजदार पाहिजेत. हे पुरुषही धर्मरक्षण व संस्कृती रक्षण करणारे असावे, असेही अपर्णाताईंनी सांगितले.  

यावेळी अपर्णाताईंना वेदमंत्रोपचारात शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र व २१ हजार रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे सचिव प्रसन्न बारलिंगे यांनी सत्कारमूर्तीचा परिचय करून देऊन गौरवपत्राचे वाचन केले. यावेळी नीता पांडे व त्यांच्या चमूने शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला. अध्यक्ष अजेय देशमुख यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानची स्थापना, उद्देश व कार्याची माहिती दिली. शुभांगी चिंचाळकर यांनी संचालन केले, तर संजय बारहाते यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.