ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे. ते वाढविण्यासाठी शहरात राहून शिक्षण घेता यावे, यासाठी मुलींचे वसतिगृह आवश्यक आहे. शहरात लवकरच मुलींच्या वसतिगृहास मंजुरी घेऊन काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
असोसिएशन ऑफ मायनॉरिटीज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दहावी-बारावीतील अल्पसंख्याक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पालकमंत्री क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाला. येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात झालेल्या या कार्यक्रमास मौलाना मुक्ती जावेद, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. फारूक खाजा, प्रा. सुशीला मोराळे आदी उपस्थित होते.
मंत्री क्षीरसागर म्हणाले, की राज्य सरकार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलती देत असल्याने त्यांचे शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. परंतु सर्व सवलतींची अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील सुशिक्षितांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेऊन मोठे यश मिळवणे कौतुकास्पद असून, येथील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांमध्ये ते पाहावयास मिळत आहे. जिद्द, आत्मविश्वास, कठोर परिश्रमामुळेच शिक्षणात चांगली यशप्राप्ती होऊ शकते. शेख निझाम यांनी प्रास्ताविक, तर अश्पाक यांनी सूत्रसंचालन केले. पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.