News Flash

बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली १०.२२ टक्क्यांनी पुढे

बारावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा तब्बल १०.२२ टक्के इतक्या जादा प्रमाणात मुलींनी उत्तीर्ण होण्यामध्ये यश मिळविले आहे.

| May 31, 2013 01:53 am

बारावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा तब्बल १०.२२ टक्के इतक्या जादा प्रमाणात मुलींनी उत्तीर्ण होण्यामध्ये यश मिळविले आहे. मुलांपेक्षा अभ्यासात आपण पुढे आहोत, हेच या यशाने मुलींनी दाखवून दिले आहे. मुलींचा अभ्यासाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, अभ्यासाविषयीची आस्था यामुळे त्यांना हे यश प्राप्त करता आले असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी नोंदविली आहे. तर मुलांना अभ्यासापेक्षा चंगळवादाच्या गोष्टीमध्ये रस असल्याने तसेच काम करीत शिक्षण घ्यावे लागत असल्याने त्यांची शिक्षणामध्ये पिछेहाट होत असल्याचा निष्कर्षही पुढे आला आहे.    
गुरुवारी १२वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिली असता मुलींनी मुलांवर मात केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कोल्हापूर विभागामध्ये या परीक्षेसाठी ५७ हजार ४८७ मुले बसली होती. त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ४५ हजार ७२४ म्हणजे ७९.५४ टक्के इतकी आहे. तर ४७ हजार ८० विद्यार्थिनींपैकी या परीक्षेत ४२ हजार २५७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.७६ टक्के इतके आहे. याचा अर्थ मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत १०.२२ टक्के इतके जादा आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एम.सी.व्ही.सी.अशा सर्व शाखांमध्ये मुलींनी मिळविलेले यश धवल आहे.   
मुलांपेक्षा मुलींनी मिळविलेल्या यशाचे कौतुक समाजाच्या सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. बारावीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन मुलींनी सुरुवातीपासूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेले असते. वर्गातील नित्याची उपस्थिती, आवश्यक कोचिंग क्लासेसना हजर राहणे, घरी असताना अधिकाधिक वेळ अभ्यासासाठी देणे या गोष्टींमुळे मुलींचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला असतो. अभ्यास करतानाही त्या एकाग्र झालेल्या असतात. परिणामी परीक्षेमध्ये त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.    
सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना असलेली व्यापक संधी विद्यार्थिदशेतच मुलींच्या निदर्शनाला आलेली असते. या संधीचा फायदा घेऊन आपले करीअर अधिक चांगले करण्यासाठी त्या अभ्यासाकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवत असतात. शिक्षकांची शिकवणी आणि त्यांनी ठरवून दिलेला अभ्यास याकडे मुली दुर्लक्ष करीत नाहीत. परिणामी, त्यांना चांगले गुण मिळण्याबरोबरच पुढील काळात नोकरीच्या चांगल्या संधीही उपलब्ध आहेत. केवळ बारावीच नव्हेतर स्पर्धात्मक परीक्षांतून मुली मुलांपेक्षा आघाडीवर आहेत. यामागे त्यांची ध्येयवादी दृष्टी व कष्ट करण्याची तयारी कारणीभूत आहे, अशी प्रतिक्रिया प्रा. डॉ. रूपा शहा यांनी नोंदविली.     मुली अभ्यासामध्ये ज्या तन्मयतेने रममाण होतात त्या तुलनेत मुले मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. सिनेमा, मोबाईल, मित्रांसोबत फिरणे, हॉटेलिंग अशा चंगळवादाकडे त्यांचा कल असतो. शिवाय पालकांचा धाकही बराचसा कमी झालेला असल्याने मुलांचे अभ्यासावरून लक्ष उडलेले असते. उलट अशा गोष्टी करण्यास मुलींना मनाई असते. सामाजिक बंधनामध्ये त्या अशा गोष्टी करण्यास धजावताना दिसत नाहीत, असे मत राष्ट्रपती पुरस्कारविजेते शिक्षक डी. बी. टारे यांनी व्यक्त केले. दहावीनंतर गरीब घरातील बहुतेक मुले नोकरीमध्ये गुंतलेली असतात. शिक्षण व नोकरी या दोन्हीचे संतुलन साधण्यात त्यांना अडचणी येतात. खरेतर अशा मुलांमध्ये गुणवत्ता लपलेली असते. त्यांची क्षमता लक्षात घेऊन प्राध्यापकांनी समुपदेशन करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 1:53 am

Web Title: girls outshine boys this year in the hsc results
Next Stories
1 अभियान राबवूनही कॉपीला सुगीचे दिवस
2 छोटय़ा मुलीला पळवण्याचा प्रयत्न
3 वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा खर्च टाळून छोटय़ा मुलीला शस्त्रक्रियेद्वारे जीवनदान
Just Now!
X