काटोलच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेले १४.०४ कोटी रुपये वारंवार पाठपुरावा करूनही केंद्राला प्राप्त होत नसल्याने आमदार डॉ. रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तसे पत्र पाठवले आहे.
काटोलच्या केंद्रात मोसंबीवर्गीय फळे व इतर फळांवर संशोधन केले जाते. त्या ठिकाणी कृषी तंत्र, फळविषयक तंत्रज्ञान, तसेच विस्तार शिक्षणविषयक कामकाज केले जाते. संत्रा सिडलेस व मोसंबीचे काटोल-गोल्ड हे वाण याच केंद्राने विकसित केले आहे. शेतकऱ्यांच्या हितावह काम पुढेही चालू राहण्यासाठी संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा व उपकरणांची आवश्यकता जाणून २०१० मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत १४.०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, मात्र अद्याप एक छदाम या केंद्राला मिळालेला नाही.