आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर राखीव मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारशिंदे किंवा त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेसजनांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.
राहुल गांधी हे नुकतेच पुणे भेटीवर आले असता सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने, महापौर अलका राठोड यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शहराध्यक्ष धर्मा भोसले, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, पंढरपूरच्या वसंतराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, अॅड. रामहरी रूपनवर, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
राज्य व केंद्रात अनेक वर्षांपासून सोलापुरातून प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा मनोदय यापूर्वी वारंवार बोलून दाखविला होता. परंतु राजकीय परिस्थिती विचारात घेता काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिंदे यांना निवडणूक न लढविण्याची मुभा कितपत देईल, याबद्दल राजकीय जाणकार शंका उपस्थित करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसला सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मानले जाते. या पाश्र्वभूमीवर शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी. शिंदे हे निवडणुकीस उभे राहणार नसतील तर त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना संधी द्यावी असा आग्रह काँग्रेसजनांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांच्याकडे केला.