आपल्या जिवाची पर्वा न करता वन्यजीवांना संरक्षण देणाऱ्या सर्पमित्रांना शासनाने संरक्षण द्यावे, अशी मागणी सर्पमित्र संस्था संघटनेकडून करण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील अनेक सर्पमित्र असून त्यांचे चांगले सामाजिक कार्य येथे सुरू आहे. या सर्पमित्रांनी आतापर्यंत शेकडो नाग, घोणस, अजगर तसेच विविध प्रकारच्या संरक्षित जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करून नंतर त्यांना जंगलात सोडले आहे. याकरिता ते सदैव तत्पर राहत असतात. एखाद्या ठिकाणावरून दूरध्वनी येताच त्वरित त्या ठिकाणी जाऊन आपले कर्तव्य पार पाडतात. या सर्पमित्रांकडून निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण होत असताना त्यांचे संरक्षण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करून या सर्पमित्रांना संरक्षण देण्याची मागणी फ्रेन्डस ऑफ नेचर संस्थेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी केली आहे.
उरण तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मातीच्या उत्खननामुळे झाडे नष्ट होऊन वन्यजीवांची या झाडांवरील स्थानेही आहेत. जंगलातील पानथळेही नष्ट झाले आहेत. याचा परिणाम जंगलात वास्तव्य करणाऱ्या पक्षी आणि प्राण्यावर होऊ लागला आहे. चिमण्या, कावळ्याप्रमाणेच इतर पक्षी आणि प्राण्यांनाही याची झळ पोहोचू लागली आहे. यामध्ये सापांची वस्ती असलेली ठिकाणेच नष्ट होऊ लागली आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम वन्यजीवांवर झाला आहे.
माणसाचे नैसर्गिक मित्र असलेले अनेक वन्यजीव नष्ट होऊ लागले आहेत. वन्यजीवांमध्ये साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र असतो, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीचे संरक्षण होते. त्यामुळे शेतकरी कधीच साप मारत नाही. मात्र जसजशी जमिनी कमी होऊन शहरीकरण वाढू लागले, तसे हे साप शहरातील नागरी वस्तीकडे वळले आहेत. शहरातील मंडळीकडून गैरसमज आणि भीतीपोटी हे साप मारले जात आहेत. या सापांचे संरक्षण होणे गरजेचे असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी हे सर्पमित्र वेळोवेळी पार पाडत असतात, परंतु या सर्पमित्रांच्या संरक्षणाबाबत शासनाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने सर्पमित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते.निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवून निसर्गातील वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने फ्रेन्डस ऑफ नेचर (फॉन), वन्य जीव संरक्षण संस्था आदी संस्था काम करीत आहेत. नुकताच वन्यजीव संस्थेचे कार्यकर्ते आनंद मढवी यांना चिर्ले परिसरातून एक घार जखमी आवस्थेत सापडली होती, तर धुतूम येथील जाळ्यात अडकलेल्या कोब्रा जातीचा नागही जखमी झाला होता, त्यांच्यावर उपचार करून त्यांना आनंद मढवी या सर्पमित्राने जीवनदान दिले होते. तर चिरनेर परिसरात एका महिन्यात तीन अजगर आढळून आले होते. त्यांना सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी जीवदान दिले, त्याचप्रमाणे उरणमधील रघू नागवेकर याने नाग, घोणस यांना जीवदान दिले.