पोलीस दलात नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये पोलिसांच्या पाल्यांना १० टक्के आरक्षण देण्यात यावे, तसेच पोलिसांच्या पाल्यांसाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी अशा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून त्यात शैक्षणिक आरक्षण दिले जावे, आदी मागण्यांचे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशनने गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दिले.
राज्यातील सर्व जिल्ह्य़ांच्या ठिकाणी पोलिसांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहाची निर्मिती करावी, नाशिक व तासगावच्या धर्तीवर पोलीस प्रशिक्षण अकादमी मराठवाडय़ाची राजधानी औरंगाबादेत सुरू करावी, पोलीस कल्याण योजनेंतर्गत पोलिसांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा देणे रुग्णालयांना बंधनकारक करावे, पोलिसांच्या मुला-मुलींना उद्योग-व्यवसाय उभारणी करण्यासाठी बँकेकडून कर्ज दिले जावे, पोलिसांच्या पाल्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, शहीद पोलिसांच्या कुटुंबाला एस. टी. व रेल्वे प्रवास मोफत करावा, आदी मागण्या निवेदनात आहेत. संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य यांनी ही माहिती दिली.