दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाल्यानंतर डी. आर. तथा आनंदराव चव्हाण यांच्याबरोबरच यशवंतरावांनाही केंद्रात प्रतिष्ठेच्या मंत्रिपदावर संधी मिळाली आणि कराड हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हेतर केंद्र शासनाच्या दरबारीही दबदबा निर्माण करून राहिले. दरम्यान, प्रेमलाकाकी चव्हाण, पी. डी. पाटील, विलासराव पाटील-उंडाळकर, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराडचा राजकीय दबदबा कायम वृद्धिंगत होत राहिला. आज माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी झालेली निवड कराडच्या राजकीय, सामाजिक प्रतिष्ठेला झळाळी देणारी ठरली आहे.
शरद पवारांचे जीवश्च, कंठश्च मित्र म्हणून राजकीय, सामाजिक क्षेत्रात वजनदार असलेले श्रीनिवास पाटील यांना निष्ठा व जबाबदारीबाबतची तळमळ व सनदी अधिकारी म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवाची पोचपावती म्हणूनच ही संधी मिळाल्याचे मानले जात आहे. कायम लोकात राहणे पसंत करणारे श्रीनिवास पाटील राजकीय, सामाजिक क्षेत्राबरोबरच कला, लोककला, क्रीडा यासह सर्वच क्षेत्रांतील व्यासपीठावर ठसा उमटवून राहिले. त्यांच्या राज्यपालपदाच्या निवडीच्या वृत्ताने कराडमध्ये आज उत्साहाचे वातावरण पसरले. त्यांच्या येथील कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तर आपणच राज्यपाल झाल्याच्या आविर्भावात श्रीनिवास पाटील यांच्या निवडीवर अत्यानंद व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे किचन कॅबिनेट असणारे श्रीनिवास पाटील हे केवळ पवारांचे जिवलग मित्र म्हणून त्यांना ही संधी मिळालेली नाहीतर राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रांतील कार्याबरोबरच उमेदीच्या काळात प्रशासनकर्ते म्हणून त्यांनी बजावलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची ही नियुक्ती झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
शासकीय सेवेतील, लोकसभेतील
अनुभव उपयोगी येईल- पाटील
सिक्कीम राज्य हे पाच देशांच्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर असल्यामुळे त्याला एक राष्ट्रीय दृष्टीने विशेष महत्त्व आहे. ही जबाबदारी पार पाडताना मला ३४ वर्षांचा शासकीय अनुभव व १० वर्षांचा लोकसभेतील लोकप्रतिनिधी अनुभव उपयोगी पडेन, असा विश्वास श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला आहे.  सातारा जिल्ह्यातील सर्व मतदार, कार्यकर्ते व शुभचिंतकांनी गेली १० ते १५ वर्षे मला जे प्रेम, पाठिंबा व शुभेच्छा दिल्या त्याचीच ही फलश्रुती आहे असे मी मानतो व त्या सर्वाचेही मनापासून आभार मानतो. आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांत ही संधी मला देण्यात आली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.